जिल्ह्यात दोन ठिकाणी लालपरीला अपघात ; 69 प्रवासी जखमी

0

आठ जणांची प्रकृती नाजूक ; कन्हेरे फाट्याजवळ तसेच मेहुणबारेनजीकची घटना

जळगाव- जिल्ह्यात दोन ठिकाणी शनिवारी राज्य परीवहन मंडळाच्या बसेसला अपघात होवून तब्बल 69 प्रवासी जखमी झाले. पहिल्या घटनेत पारोळा तालुक्यातील कन्हेरे फाट्याजवळ भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या प्रयत्नात बसला धडक दिल्याने 45 प्रवासी जखमी झाले तर त्यातील आठ प्रवाशांना जबर ईजा झाल्याचे सांगण्यात आले तर दुसर्‍या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारेनजीक बस व कंटेनरची समोरा-समोर धडक झाल्याने 24 प्रवासी जखमी झाले.

ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रक आदळला बसवर
पारोळा तालुक्यातील विटनेर गावापुढील कन्हेरे (ता. पारोळा) फाट्याजवळ धुळ्याकडून जळगावकडे जाणार्‍या ट्रक (जी.जे 01 सीजी 0912) ने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून धुळे आगाराच्या जळगाव-धुळे बस (एम.एच.20- 1957) ला समोरून धडक दिली. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात 45 प्रवासी जखमी झाले तर त्यातील आठ प्रवाशांना जबर ईजा झाली. या अपघातात बस चालकासह ट्रक चालकही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात बस चालक फारूक शेख जब्बार यांच्यासह 45 प्रवासी जखमी झाले.

मेहुणबारेनजीक कंटेनर आदळला बसवर ; 24 प्रवासी जखमी
विनावाहक असलेली धुळे ते औरंगाबाद बस (क्र. एम.एच. 20 बी.एल. 2599) ही दुपारी औरंगाबादकडे निघाली असताना कंटेनर (एन.एल. 01 क्यु. 4136) मध्ये धडक होवून बसचालक एस.एस.सय्यद यांच्यासह 24 प्रवासी जखमी झाल्याची घटना मेहुणबारेजवळ गिरणा पुलाच्या टोकाला दसेगाव फाट्यानजीक शनिवारी दुपारी 2.30 वाजता घडली. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातात दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच आगारप्रमुख संदीप निकम, आगाराचे वर्कशॉप प्रमुख मनोज भोई, संतोष वाघ, सुरेश भोसले तातडीने घटनास्थळी रवाना होत प्रवाशांना तातडीची मदत दिली.