मजरेहोळनजीक कार-दुचाकी धडकेत दोघे ठार तर चिंचगव्हाण फाट्यावर टेम्पो उलटल्याने एकाचा मृत्यू
जळगाव- जिल्ह्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्यावर तमाशा कलावंत घेऊन जाणार्या टेम्पोला अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले तर दुसर्या घटनेत चोपडा तालुक्यातील मजरेहोळ फाट्याजवळ कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला.
चोपड्याजवळ अपघात ; दोघांचा मृत्यू
चोपडा तालुक्यातील मजरेहोळ फाट्याच्या जवळ भरधाव कार (क्र.एम.एच 28 व्ही. 1726) ने दुचाकीला धडक दिल्याने भाऊसाहेब पाटील (50) व पमाबाई पाटील (52) हे ठार झाले. शनिवारी दुपारी साडेचार वाजता हा अपघात घडला. भाऊसाहेब हे खाचणे येथून वेले येथे दुचाकीने जात असताना त्यांना गावातील पमाबाई यांनी हात देऊन त्यांची गाडी थांबवल्यानंतर त्यांना मागे बसवून भाऊसाहेब पाटील निघाले मात्र काही अंतरावरच क्रुर काळाने त्यांच्यावर झडप घातली.
तमाशा कलावंतांचा टेम्पो उलटला ; एक ठार, तीन जखमी
चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण फाट्याजवळ शिरसगाव येथील तमाशाचा कार्यक्रम आटोपून शहादा तालुक्यातील जावद्याकडे निघालेल्या कलावंतांचा टेम्पो (क्र. एम.एच.17 बी.डी. 1115) उलटल्याने किशोर रतन कोल्हे (गाडेगाव, जि.बुलढाणा) हे ठार झाले तर वाहनधारक अंबादास बाबूराव सदावर्ते (टाकळी, ता.फुलंब्री) व नुराबाई शेख, दादा आचारी अन्य तिघे जखमी झाले. शनिवारी हा अपघात झाला. गणेश राजेश सांगवीकर हे कलावंतांसह कार्यक्रमासाठी शिरसगाव यात्रेत आले होते. 24 रोजी कार्यक्रम आटोपून कलावंत महेंद्रा पीकअप वाहनाने जावद्याकडे जात असताना महामार्गावरील शिवबा हॉटेलजवळ वाहन उलटले.