खोदाई मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ ; पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मंदिरांची रंगरंगोटी करून रोषणाई ; पोलिसांची राहणार सीसीटीव्हीद्वारे नजर
नंदुरबार । हिंदूंचा पवित्र असा उत्सव नवरात्रोत्सावास आजपासून प्रारंभ होत आहे. या नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. लहानांपासून मोठ्यांनी नवरात्रीची तयारी केलेली आहे. जिल्ह्यांत दुर्गात्सव मंडळांची स्थापना करून नवरात्रोत्सव साजरा करीत असतांना घरा घरांत देखील घटस्थापन करून देवींचे आवाहन करण्यात येत आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पहिल्या माळेपासून शहरातील खोदाई मातेच्या यात्रेत प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती. नवरात्रोत्सवात पोलिसांनी अनुचीत प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे. शहरातील मंडळे गरबानृत्यासाठी सज्ज झाले आहेत. गुरुवारपासून घराघरात घटस्थापना करण्यात आली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पसरले आहे.
जागृत भगवती मंदिरावर रोषणाई
श्राद्धपक्षानंतर विविध धार्मिक सण सुरु होतात. नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर दहाव्या दिवशी सीमोल्लंघन करुन दसरा साजरा केला जातो.आज दि.२१ सप्टेंबर रोजी घटस्थापनेला नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. यानिमित्ताने शहरात असलेली साडेतीन पिठाची प्रतिरुप असलेल्या जागृत भगवतींच्या मंदिरासह परिसरात रात्रंदिवस सजावतींसह विद्युत रोषणाई व स्वच्छतेची कामे करण्यात आली आहे.
पुजेचा पहिला मान रघुवंशी कुटूंबाला
ही यात्रा दसर्यापर्यंत सुरू राहत असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारलेला असतो. यशवंत विद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या यात्रेत मनोरंजनाचं साहित्य, तसेच खवैयांसाठी विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. पहिल्या माळेपासून तर नवव्यामाळेपर्यंत खोडाई मातेच्या दर्शनासाठी भाविक हजेरी लावतात. पहाटे तर महिला भाविकांची मोठी गर्दी असते. पूजेचा पहिला मान रघुवंशी कुटुंबियांना आहे. या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा दौड देखील काढण्यात येते. यात शेकडो तरुण सहभागी होतात.
दांडीया, गरबाच्या सरावात तरूणाई दंग
शहरातील वातावरण दांडीया आणि वैंविध्यपूर्ण खेळाने भारावून जाते. सायंकाळच्यावेळी शहर परिसरातील सोसायटी तसेच नवरात्र मंडळ परिसर भक्तीमय झालेला दिसून येतो. नवरात्र मंडळाच्या देखील दांडिया व गरबा सराव तसेच विविध पारंपारिक खेळाचे सराव सुरू झाले आहेत. खास तरूण वर्ग नवरात्रमध्ये या खेळाकडे आकर्षक झाला आहे. नवरात्र मंडळाचीही मंडप बांधणी व सजावटीची जय्यत तयारी केली आहे. ज्या ठिकाणी नवरात्र मंडळाच्या देवी बसणार आहेत, अशा गणेश मंडळानी मंडप तसेच ठेवले आहेत.
राजस्थानी पेहरावाच्या मागणीत वाढ
नवरात्रीमध्ये तरूणाईचा आकर्षक पेहराव घागरा-चोली तसेच आकर्षक राजस्थानी घागर्यांची मागणी वाढलेली आहे. काही जण खास नवरात्रीसाठी विशेष ड्रेपरी तयार करून घेत आहेत. ड्रेपरीवर मॅचिंग अशी आकर्षक डिझायनर दागिन्यांचीही अलीकडे क्रेझ वाढली आहे. दागिने महागड्या स्वरूपाचे असल्याने काही तरूणी भाडेतत्वावरही बाजारात दागिने घेत आहेत. त्याचप्रमाणे कपल घागरा चोली देखील नऊ दिवसांच्या भाडेतत्वावर दिली जात आहे. यासाठी जवळपास दोन ते तीन हजार रुपये खर्च नऊ दिवसांचा आहे. तसेच बच्चे कंपनीसाठी देखील धोती, घागरा चोली आणि राजस्थानी ड्रेसला मागणी वाढली आहे. या ड्रेसची किंमत ५०० रुपयांपासून सुरू आहे.
मातेच्या मंदिरांची आकर्षक सजावट
शहरातील मुख्य आकर्षण असलेले दोंडाईचा रस्त्यालगत श्री सप्तशृंगी माता मंदिर हे परिसरातील भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा परिसर भव्य असल्याने भाविक हजेरी लावतात. श्री तुळजाभवानी माता मंदिरासमोरील आवारात अनेक व्यापारी दुकाने थाटतात. नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी शहरात जागृत प्रतिरुप असलेल्या सप्तशृंग निवासिनी श्री सप्तशृंगी माता मंदिर, तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी माता मंदिर, अबुअंबाजी गुजरात निवासिनी श्री अंबाजी माता मंदिर, पाकिस्तान येथील बलुचिस्थान निवासिनी श्री हिंगलाज माता मंदिर, कोल्हापुर निवासिनी महालक्ष्मी माता, लक्ष्मीनारायण मंदिरासह शितलामाता मंदिर, गायत्री माता मंदिर सजविण्यात आली आहेत. नारायण मंदिरांसह श्री शितलामाता मंदिर, श्री गायत्रीमाता मंदिर सज्ज होत
आहेत.
पावसाच्या आगमनाने दुकाने कमी
गेल्या अनेक वर्षापासून दोंडाईचा रोडलगत श्री तुळजाभवानी माता मंदिरा समोरील मैदानात व्यापारी दुकांनांसह छोटा-मोठा झुला, ब्रेक डान्स पाळणा, ड्रागन पाळण्यासह विविध प्रकारचे पाळणे व मौत का कुवा आदी यात्रेत उभे करतात. सध्या दोन दिवसांपूर्वी वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील मोठा भाग पाण्याने व्यापला आहे. या परिस्थितीत व्यापार्यांनी कमी जागेत दुकाने थाटली आहेत. पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन व महसूल विभागाने त्याठिकाणी सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे.
विविध मनोरंजनाची साधने दाखल
शहादा शहरातील सप्तशृंगी माता, अंबाजी माता, तुळजाभवानी माता मंदिरे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजविली जात आहे. गुरूवार २१ सप्टेंबरपासून घटस्थापनेला नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून शहरातील मंदिरांमध्ये स्वच्छता, रंगरंगोटी, सजावटीची कामे अंतिम टप्प्यात सुरु आहेत. जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून हजारोंच्या संख्येने भक्त हजेरी लावतात. याभक्तांचा विरंगुळासाठी मनोरंजनाची पाळणे, मौत का कुवा व विविध खेळाची साधने शहरातील प्रेस मारुती मैदानावर सज्ज झाली आहेत.