जळगाव । जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत टप्पा 2 मध्ये 57 कोटी 98 लाख इतक्या निधीतून 557 कामे मंजुर झाली. दरम्यान यातील 542 कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील 3 हजार 557 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याचे अहवालात नमुद आहे. एवढे क्षेत्र सिंचनाखाली आले असुन देखिल पाणी टंचाईची समस्या सद्याच्या 891 गावांमध्ये मोठ्याप्रमाणावर कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध तालुका व तालुक्यातील 77 गावांमध्ये 41 टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे जिल्हापरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असुन इतक्या कोटींचे खर्च करुनही सद्दस्थीती अतिशय विदारक स्वरुपाची आहे. योजनांची आकडेेवरी फक्त कागदांवरच रंगवल्या असुन केलेल्या कांमांचे परिणाम दिसत नाही, याउलट जमिनीची पातळी अजुन खोल गेली आहे, हे सद्द परिस्थितीतुन स्पष्ट दिसते.
टंचाईचा सामना
शासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे होऊन हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा गाजावाजा जि.प. कडुन केला जात आहे. मात्र सद्यस्थितीचा आढाव्यानुसार सिंचनाच्या कामांचा कुठलाही फायदा कामे झालेल्या गावांना होत नसल्याने टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली असुन मे व जून महिन्यापर्यंत काही तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहणार असल्याची परिस्थिती येवुन ठेपली आहे. जिल्हा परिषदेने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 29 कोटी 50 लाखांचा आराखडा मंजूर केला असुन एप्रिल ते जून या काळात 271 गावांना टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अमळनेर तालुक्यात सध्यास्थितीत सर्वाधीक 41 गावांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
136 विहीरी अधिग्रहीत
अमळनेरातील 33 गावांमध्ये 33 विहीरी, जामनेर तालुक्यात 29 गावांमध्ये, धरणगाव तालुक्यात 10 गावांमध्ये, जळगाव 4 गावांमध्ये, एरंडोल तालुक्यात 5 गावांत, भुसावळ 8 गावात, मुक्ताईनगर तालुक्यात 13 गावात, बोदवड तालुक्यात 10, पाचोरा 6, चाळीसगाव तालुक्यात 5 , भडगाव तालुक्यात 1, पारोळा तालुक्यात 12, चोपडा तालुक्यात 1 विहीर.
या तालुक्यात 16 टॅकरने पाणीपुरवठा
जामनेर तालुक्यात 18 गावांना 13 टँकरव्दारे पाणी पुरवठा पुरविला जात आहे. तर भुसावळ एक टँकर, बोदवड 1, पाचोरा 1, चाळीसगाव 1, पारोळा 14 गावांमध्ये 6 टँकर असे एकूण 77 गावांमध्ये 39 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तब्बल 77 गावांमध्ये जिल्ह्यत पाणी टंचाईचे सावट असल्याने नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
2 कोटींच्या कामांना मंजुरी मिळेना
पाणी टंचाई कार्यक्रमात जिल्ह्यामध्ये विहीर खोलीकरण, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, विशेष दुरुस्ती अंतर्गत 59 गावांमध्ये 59 कामे प्रस्तावित आहे. यांचा अंदाजपत्रकीय किंमतीनुसार एकूण खर्च 2 कोटी 42 लाख 43 हजार 934 रुपये असून या कामांना अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळालेली नसल्याने हि कामे सुरुच झाली नसल्याचे दिसून येते.