उद्यापासून जिल्हाभरात होणार तपासणी : पुरवठा विभागाचे पथक नियुक्त
जळगाव : जिल्ह्यात अनेक रेशन दुकानदार दुकाने बंद ठेवतात, वेळेवर ग्राहकांना धान्य देत नाही, दिले तर कमी असते अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांच्या पथकाने अचानक भडगाव, चोपडा तालुक्यातील दुकानांची तपासणी केली. त्यात अनेक दुकान बंद आढळली यामुळे बंद दुकानांवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार अशी माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
पुरवठा विभागाचा सर्व कारभार ऑनलाईन झाला असला तरी त्यावर कडी करणार्यांचीही कमतरता नाही. ऑनलाईन प्रणाली कार्यान्वीत करूनही जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार मुदतीच्या आत धान्याची उचल करीत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच जे दुकानदार धान्य उचलतात ते लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात या स्वरूपाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी भडगाव आणि चोपडा तालुक्यातील रेशन दुकानांची अचानकपणे तपासणी केली. या तपासणीत अनेक दुकाने बंद आढळुन आली. या बंद दुकानांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
धान्य वाटपाची माहिती घेणार
जिल्ह्यातील रेशन दुकानांना देण्यात आलेले नियतन, वाटप झालेले, शिल्लक नियतन, ईपॉस मशिनद्वारे झालेले वाटप आदी माहिती तपासली जाणार आहे. ही तपासणी केली तर चुका अधिकार्यांच्या लक्षात येतील त्यामुळे अनेक रेशन दुकानदार हेतू पुरस्कर तपासणी दौर्या दरम्यान दुकाने बंद ठेवीत असल्याचे निदर्शनास आले आहे. चोपडा भडगाव तालुक्यात रेशन दुकाने तपासणीत अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे. काही दुकाने बंद होती. यामुळे जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार या तालुक्यातील दुकाने कारवाईच्या रडारवर आहेत.
सोमवारपासून दुकानांची तपासणी
येत्या सोमवारपासून पुन्हा रेशन दुकाने तपासणीचा दौरा जाहीर करण्यात येणार आहे. तपासणीसाठी येणार असे संबंधित रेशन दुकानदारांना कळविले जाणार आहे. तरीही त्यांनी जर दुकाने बंद ठेवली तर त्या दुकानाचा परवाना रद्द करून दंडाचीही कारवाई केली जाणार आहे. मार्च महिना सुरू असल्याने सर्वच रेशन दुकानांची तपासणी केली जाणार आहे.