पुणे । पुण्याजवळील भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद सायंकाळी चारवाजता मागे घेत असल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. आमच्या बंदला सुमारे 250 संस्था, संघटनांचा पाठिंबा होता असेही त्यांनी सांगितले. सोबतच या हिंसाचाराचे सूत्रधार संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि स्थानिक नेता घुगे यांच्यावर तत्काळ कारवाई अशी मागणी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत केली. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे हे सूत्रधार असल्याचे जाहीर केल्यानंतर आंदोलकांनी दुपारी मॉडेल कॉलनीतील त्यांच्या घरावर मोर्चा काढला. एकबोटे यांच्या घराबाहेर दलित आंदोलकांचा मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी तेथे सुरक्षा वाढवली. घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यांत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरात तणाव; पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त
हडपसर भागातील भेकराईनगर येथे सकाळी पीएमपी बस आणि एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या भागातील बंदोबस्तात तातडीने वाढ करण्यात आली. विश्रांतवाडी भागातील मुख्य चौकात दुपारी बाराच्या सुमारास कार्यकर्ते जमले. कार्यकर्त्यांकडून भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यात आला. शहरात दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांकडून तातडीने बंदोबस्तात वाढ करण्यात आली. खडकी, दापोडी, विश्रांतवाडी भागातील दुकाने बंद करण्यात आली. पुणे स्टेशन परिसर, साधू वासवानी चौक, मांजरी, भेकराईनगर, गुलटेकडी, कात्रज येथील राजीव गांधी उद्यानानजीक, हडपसर, आव्हाळवाडी, गंगानगर, नेहरूनगर, पिंपरी-चिंचवड आणि देहू रोड भागात पीएमपी गाडयांची तोडफोड करण्यात आली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
समाज माध्यमातून प्रक्षोभक संदेश प्रसारित करणार्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समाजमाध्यमातून अफवा पसरवणार्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा सायबर गुन्हे शाखेकडून देण्यात आला आहे. अशा प्रकारचे संदेश आढळल्यास तातडीने सायबर गुन्हे शाखेकडे (दूरध्वनी-020-26123346) तक्रार करावी, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आले.
राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील बंदोबस्तात मंगळवारी दुपारनंतर वाढ करण्यात आली. राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. या भागात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील भागात शीघ्र कृती दलाच्या तुकड्या (रॅपिड अॅक्शन फोर्स) तैनात करण्यात आल्या होत्या.
शाळांना, काही कंपन्यांना सुट्टी
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात काही घटना वगळता बंद शांततेत पार पडला. आज दुपारी 12 च्या सुमारास आंदोलन आक्रमक झाले होते. त्यांनी सुखसागर भागात वाहनांवर दगडफेक केली. पुणे शहरातील लोकांनी खबरदारी म्हणून सकाळपासून दुकाने, मॉल बंद होते. पुण्यातील शाळांना, काही कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. रस्त्यावर वाहतूकही तुरळक होती. पुणे-बारामती बस सेवा बंद करण्यात आली होती. महाराष्ट्र बंदचे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पडसाद उमटत होते. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.