जळगाव । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आश्चर्यकारकरित्या जुन्या मातब्बर सहकार्यांना दूर सारत नवीन चेहर्यांना कार्यकारिणीत संधी देण्याचा निर्णय अत्यंत धाडसी मानला जात आहे. यातून मनसेतील मरगळलेपण दूर होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पध्दतीने जळगाव जिल्ह्यातही पक्षात नवसंजीवनी प्रदान करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यातही मरगळलेपणा
जिल्ह्यात आधी जळगाव शहरासह पाचोरा, भुसावळ, पारोळा, एरंडोल आदी तालुक्यांमध्ये मनसेचे चांगले संघटन होते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकण्यात अपयश आले. यातून पक्षात अस्वस्थतेचे वारे पसरले. पाचोर्यातून पक्षाचे मातब्बर नेते डी.एम. पाटील यांनी भाजपची साथ घेतली, किरण शेलार हे सध्या राजकारणापासून दूर आहेत. पारोळा-एरंडोलमधून लक्षणीय मते मिळवणारे नरेंद्र पाटील हे सध्या शांत आहेत. तर भुसावळात निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराला तिकिट दिली गेली.
ठाकरे व कोल्हेंमध्ये दरी?
2013च्या महापालिका निवडणुकीत मनसेने जळगाव महापालिकेत जोरदार मुसंडी मारली होती. यानंतर ललीत कोल्हे यांनी पक्षाच्या तिकिटावर जळगाव विधानसभेत तगडे आव्हानही उभे केले होते. तथापि, गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि ललीत कोल्हे यांच्यातील विसंवाद चर्चेचा विषय ठरला आहे. सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. अलीकडे जमील देशपांडे हे पक्षाचे काही उपक्रम राबवत असले तरी तशी पक्षांतर्गत शांतताच दिसत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय तथा माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर हेदेखील स्थानिक पातळीवर फारसे सक्रीय नाहीत.
विठ्ठल आणि बडवे
शिवसेनेतून बाहेर पडतांना राज ठाकरे यांनी अत्यंत कडवटपणे आपली लढाई विठ्ठलाशी नसून त्यांच्या भोवतीच्या बडव्यांशी असल्याचे वाक्य खूप गाजले होते. यातून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर व्यक्त करत त्यांच्याभोवतीच्या कोंडाळ्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात हा शब्द सातत्याने वापरला जात आहे. मात्र अलीकडे खुद्द मनसेतही याच पध्दतीची वातावरणनिर्मिती झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.