पुणे । जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 13 तालुक्यांमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान हे शिबीर होणार आहे. यात सहभागी होणार्या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिली.
स्त्रीरोग, बालरोग, ऑपरेशन, अस्थिरोग, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग, नाक, कान, घसा, कॅन्सर आदी आजारांबाबत यावेळी चाचणी करण्यात येणार आहे. पुण्यातील ससून, औंध येथील जिल्हा हॉस्पिटल, भारती, डॉ. डी. वाय. पाटील, देवयानी, सह्याद्री, बुधरानी, ग्लोबल, इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर रिसर्च सेंटर, पवना हॉस्पिटल या शिबीरात सहभागी होणार आहे.
25 जुलै आंबेगाव, 26 जुलै शिरूर, 27 जुलै मावळ आणि दौंड, 28 जुलै मुळशी, 29 जुलै इंदापूर, 31 जुलै पुरंदर, 1 ऑगस्ट हवेली, 2 ऑगस्ट भोर आणि 4 ऑगस्ट रोजी जुन्नर आणि वेल्हा तालुक्यात हे शिबीर होणार आहे. दरम्यान खेड आणि बारामती तालुक्यातील शिबीरांच्या तारखा अद्याप निश्चित करण्यात आल्या नसून त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही सभापती प्रविण माने यांनी सांगीतले.