जिल्ह्यात मुख स्वास्थ्य तपासणी मोहिम

0

जळगाव । देशात मौखिक कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. मौखिक कर्करोग पूर्वस्थितीत लक्षात आला तर त्यावर त्वरीत उपचार व समुपदेशन करुन त्या व्यक्तीचे जीवन वाचविता येवू शकते. यासाठी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून राज्यात 1 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत 30 वर्षावरील नागरीकांची मुख स्वास्थ तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. पुजा गोस्वामी, डॉ.श्रीमती चावला आदि उपस्थित होते.

एकत्रित रित्या मोहिम राबविणार
मुख स्वास्य हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. मुख स्वास्थ जर व्यवस्थित ठेवले तर पुष्कळ आजारांपासून आपण वाचू शकतो. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात अधिक आढळुन येतो. मौखिक कर्करोग जर पुर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो. तंबाखूचे सेवन करणे हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. यासाठी 1 ते 31 डिसेंबर, 2017 हा कालावधी मुख स्वास्थ तपासणी मोहिम साजरी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महानगरपालिका हे सर्व ही मोहिम एकत्रितपणे राबविणार आहेत.जर कोणा व्यक्तीला तोंडात काही त्रास, दात दुखणे, हिरडयातून रक्त येणे, तोंडात 15 दिवसापेक्षा जास्त दिवस जखम असणे, तोंड उघडता न येणे ही समस्या अथवा लक्षणे आढळली तर त्यांनी त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन आपली मुख तपासणी करुन घेण्याचे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

आंगणवाडी सेविकांना दिले प्रशिक्षण
या कालावधीत जिल्ह्यातील 30 वर्षावरील नागरीकांची गावपातळीवर घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी गावस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे. यासाठी आशा वर्कर व आंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले असून ही सुविधा सर्व शासकीय रुग्णांलयामध्ये उपलब्ध आहे. ज्या व्यक्तीमध्ये मुख्य स्वास्थाबाबत काही लक्षणे आढळून येतील त्यांना तालुकास्तरावर तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तर ज्या रुग्णांना मौखिक कर्करोगाची लक्षणे आढळतील त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात सहायता कक्ष उभारण्यात येणार आहे. ज्या रुग्णामध्ये कर्करोग आढळून येईल अशा रुग्णांवर मुख्यमंत्री सहायता निधी व इतर सेवाभावी संस्थांच्या निधीतून उपचार करण्यात येणार आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन यासारख्या संस्थाची मदत घेण्यात येणार आहे.

राज्यात 1.25 कोटी लोकांचे तपासणी केली जाणार
या मोहिमे दरम्यान महाराष्ट्रातील 30 वर्षावरील 1.25 कोटी लोकांचे मौखिक आरोग्य तपासले जाणार आहे. जिल्ह्यातही ही मोहिम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे सर्व वैद्यकीय अधिकारी यांना तोंडाची तपासणी, तोंडाच्या कॅन्सरची कारणे, टाळण्याचे उपाय, तोंडाचा कॅन्सर शोधणे, स्वस्थ्य तपासणी तसेच तंबाखुच्या दुष्परिणामाबाबत आपल्या जिल्ह्यातील कॅन्सर वॉरियर्स व दंत चिकित्सक यांच्या मदतीने प्रशिक्षण देणार असून ते जनतेमध्ये याबाबत जनजागृती करणार आहे. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एक पथक सर्व शासकीय कार्यालयांमध्ये जावून याबाबतची तपासणी करणार असल्याचे डॉ. श्रीमती गोस्वामी यांनी सांगितले.