जळगाव । नुकताच दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. येत्या आठवड्याभरात विद्यार्थ्यांना संबंधीत विद्यालयात गुणपत्रक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून प्रवेश प्रक्रिये संबंधी माहिती देण्यासाठी शुक्रवारी 16 रोजी मू.जे.महाविद्यालयात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थाचालक, प्राध्यापकांची समन्वय बैठक घेण्यात आली. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.
प्रवेश प्रक्रियेसाठी वर्ग दोनचे कर्मचारी नेमावे, शाखानिहाय प्रवेश क्षमता व प्रत्येक फेरीनंतर रिक्त जागांचा तपशिल स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यासंबंधी सुचना यावेळी देण्यात आल्या. 10 जून पासूनसर्व विद्याथ्यार्ंना प्रवेश मिळेल अशी व्यवस्था करावी यासंबंधी व्यवस्था करण्याचे आदेश दिले. यावेळी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय सहाय्यक संचालक दिलीप गोविंद, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अशोक बागुल, उपशिक्षणाधिकारी सिध्दार्थ नेतकर, शिक्षणविस्तार अधिकारी किशोर वायकोळे, माळी आदी उपस्थित होते. जिल्ह्याभरात अकरावीच्या 51 हजार पाचशे जागा आहे. यात कला शाखेच्या 23 हजार पाचशे, विज्ञान शाखेच्या 18 हजार वाणिज्य शाखेच्या 6 हजार एम.सी.व्ही.सी.च्या 3 हजार 550 जागा आहेत. जळगाव शहरात यंदा अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध आहेत. विनाअनुदानित व अनुदानित तुकड्यांसाठी जागा विभागण्यात आल्या आहेत.