जळगाव: सन २००९ मध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची २०१४ पासून गर्भगळीत अवस्था झाली आहे. नेत्यांचा पायपोस एकमेकात नसल्याने कार्यकर्ते देखिल सैरभैर झाले आहेत. अशातच जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ आणि जिल्हा परिषद या तीनही संस्थांमध्ये राष्ट्रवादी नावाला आहे. जळगाव जिल्हा हा खा. शरद पवार यांच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी खा. पवार यांनी जिल्हा नेत्यांना अनेक संधी दिल्या. या संधीचे सोने करणे मात्र नेत्यांना जमले नाही. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या या सर्वच निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीने सपाटून मार खाल्ला आहे. आता मात्र राजकीय बाहुबली असलेले एकनाथराव खडसे यांची राष्ट्रवादीत एन्ट्री होणार असल्याने नेत्यांना एकसंघ ठेवण्यात आणि पक्षवाढीसाठी जिल्ह्यात राष्ट्रवादीची मदार आता खडसेंवरच राहणार असल्याचे बोलले जात आहे.