जळगाव । पावसाळ्यातील पाण्याची जास्तीत जास्त साठवणुक होऊन पाणी पातळीत वाढ व्हावे यासाठी लघुसिंचन विभागातर्फे पाणी अडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असते. जिल्ह्यात लघुसिंचनासाठी 2016-17 या वर्षात एकुण 565 कामे मंजुर करण्यात आली होती. त्यापैकी 412 कामे पूर्ण झाले असून 127 कामे अपुर्ण आहे. लघुसिंचनाचे जवळपास 85 टक्के कामे हे पुर्ण झाले आहे. 30 जून पर्यत ही कामे पुर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मुदतीत ही कामे पुर्ण झालेली नाही. त्यामुळे उर्वरीत कामांना मुदतवाढ मिळावी यासाठी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. नेहमी प्रमाणेच मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांनी सांगितले.
जिल्ह्याभरात साठवण बंधारा दुरुस्तीचे 198, सिंमेट नालाबंधार्याचे 19, साठवण बंधारे दुरुस्ती 190, कोल्हापुर पध्दतीचे बंधारे 27, पाझंर तलाव 25, गाव तलाव दुरुस्ती 5, गाव तलाव नवीन 1 अशी 565 कामांसाठी 58 कोटी 73 लाखाची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी 412 कामांवर 42 कोटी 17 लाख निधी खर्च करण्यात आला आहे. 2017-18 मधील लघुसिंचन कामासाठी गावांची नावे तयार करण्यात आली आहे मात्र कृषी विभागाकडून आराखडा तयार करण्यात आलेला नसल्याने अद्याप कामांना मंजुरी मिळाली नाही. दरम्यान जिल्ह्याभरातुन निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याची ओरड आहे.
जिल्हाधिकार्यांनी जाणून घेतल्या तक्रारी
जळगाव । लोकशाही दिनी तक्रारी घेऊन जिल्हाधिकार्यांना भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदारांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अनोख्या पध्दतीने नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयात नागरीकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी ताटकळत उभे रहावे लागते. परंतु आज जिल्हाधिकारी यांनी तक्रारदारांच्या जागेवर जाऊनच त्यांच्या तक्रारी समजून घेतल्या व त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचनाही दिल्या.