जिल्ह्यात विसर्जनाला गालबोट

0

जळगाव (जनशक्ति ब्युरो) । सर्वत्र गणरायाला अतिशय भावपूर्ण पध्दतीने निरोप दिला जात असतांना जळगाव जिल्ह्यात मात्र श्रींच्या विसर्जनाला गालबोट लागणार्‍या तीन घटना घडल्या. भुसावळ शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह सुरू असतानाच बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ मिरवणूक आल्यानंतर गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये छेडखानीच्या कारणातून अचानक वाद उफाळल्याने एकाच्या छातीत चाकू मारण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ घडली.

दुसरीकडे शेंदुर्णी शहराजवळ असलेल्या शामसिंगबुवा धरणात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरूणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. या तिन्ही घटनांमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले.

खुनाने हादरले भुसावळ
भुसावळात बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ झालेल्या हल्ल्यात ललित उर्फ विक्की हरी मराठे (24, न्यु एरिया वॉर्ड, भुसावळ) या युवकाचा मृत्यू झाला असून या पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजता राजेश उर्फ गोलू सावकारे (20, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) यास अटक केली आहे. या प्रकरणी धीरज किशोर मराठे यांच्या फिर्यादीवरुन गोलू सावकारे या संशयीत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे करीत आहेत. अटकेतील आरोपी गोलू हा शिवसेनेचे शहर संघटक रामदास सावकारे यांचा सख्खा पुतण्या आहे.

शेंदुर्णीच्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू
तर दुसरीकडे मोराड व शेंदुर्णी रस्त्यालगत असलेल्या शामसिंग बुवा धरणात गणरायाच्या विसर्जनासाठी गेलेल्या शनिमंदिर मागील खळवाडी भागात राहणारे अकरावी शिक्षण घेणारे दोघा तरूणांचा पाण्यातील गाळाचा अंदाज न आल्याने धरणाचे गाळ मिश्रित पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत होती. मंगळवार 5 सप्टेंबर रोजी गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी उसळली असतांना शेंदुर्णी येथील एक गणपती मंडळ मोराड रस्त्यावर असलेल्या शामसिंग बुवा धरणात गणपती विसर्जनासाठी गेलेले योगेश पुना धनगर (17) व सागर संतोष धनगर (17) या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात उडी घेतली. यात योगेश धनगर गाळात अडकला हे पाहून सोबत असलेल्या सागर धनगर हा गेला असता तो सुद्धा अडकला. याची माहिती ेथील उपस्थित तरूणांनी गावात दिली. दोघांची मृत्यूची घटना घडल्याने शेंदुर्णी गावात खळबळ उडाली. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी संजय गरूड व यशवंत पाटील भेट दिल्यानंतर त्यांनी हिंगणे येथील पोहणारे तरूणांना बोलावून दोघांना बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शेंदुणी गावात शोककळा पसरली. जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून मयत दोघांना आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिरवणुकीतून बाहेर काढत केला हल्ला
पोलीससूत्रांच्या माहितीनुसार न्यू इंडिया सब्जी मंडळाची मिरवणूक मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता शिवाजी कॉम्प्लेक्सकडून विठ्ठल मंदिरमार्गे हतनूर धरणाकडे जाणार होती. ही मिरवणूक शिवाजी कॉम्प्लेक्सकडे आल्यानंतर संशयीत आरोपी गोलू सावकारे याने मयत ललित मराठेच्या गळ्यात हात टाकत त्याला शिवाजी कॉम्प्लेक्सच्या परीसरात नेले. आपल्या बहिणीकडे का पाहतो? असा जाब गोलूने ललितला विचारल्यानंतर उभयांमध्ये बाचाबाची व नंतर हाणामारी झाली. आरोपी गोलूने आपल्याकडील चाकू थेट ललितच्या डाव्या छातीच्या बरगडीवर जोरदार मारल्याने त्याचा जागीच अंत झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाला तर करण दिलीप कोळी व धीरज किशोर मराठे यांनी ललितला शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे हलवले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने गोदावरी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिल्यानंतर उपचारार्थ हलवत असतानाच रस्त्यातच मृत्यू झाला. खुनाचे वृत्त कळताच अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी धाव घेतली. रात्री दीड वाजेच्या सुमारास आरोपीला गोलू सावकारे यास अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.