जळगाव – जळगाव जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या चार वेगवेगळ्या घटना रविवारी घडल्या. अविनाश ईश्वर कोळी (वय २०, या.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाचा जळगावनजीक तलावात बुडून मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यात तापी नदीत नितीन ऊखा मराठे वय ३२ (रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, दर्यापूर शिवार) याचा बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत पळासखेडे बुद्रूक ता.जामनेर येथे गणपती विसर्जन करतांना मनीष वामन दलाल (जामनेर) या युवकांचा नदीत बूडून मृत्यू झाला. त्या पाठोपाठ भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिर येथील इयत्ता 10 वीचा विद्यार्थी प्रफुल्ल रमेश पाटील (रा. वलवाडी ता.भडगाव ) या विद्यार्थ्यांचा श्री गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
*** भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत पावलेला विद्यार्थी भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात दहावित शिक्षण घेत होता. काल गणेश विसर्जनाची धामधुम दिसुन आली. मात्र एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने तालुक्यातील वलवाडी गावावर शोककळा पसरल्याचे पहायला मिळाली. प्रफुल्ल रमेश पाटील (वय15) असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वलवाडी (ता. भडगाव) येथे गणेश विसर्जनाची लगबग सुरू होती. प्रफुल्ल पाटील हा त्याचा लहान भाऊ व काही मित्रा समवेत पारोळा रस्त्यावर असलेल्या डोहाजवळ गणेश विसर्जनासाठी गेले होते. विसर्जना दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व मुले पाण्यात बुडु लागले. ही घटना ग्रामस्थांना समजताच जवळच असलेले सध्या सुटीवर आलेले जवान निलेश पाटील व तरूण दिनेश पाटील डोहाकडे धाव घेतली. चार विद्यार्थ्याना त्यांना वाचविण्यात यश आले. मात्र प्रफुल्ल पाटील हा खोल पाण्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रफुल्लला काढल्यानंतर त्याला उपचारासाठी भडगाव, पाचोरा येथे दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रफुल्ल हा भडगाव येथील लाडकुबाई विद्यालयात दहावित शिक्षण घेत होता. त्याचे वडील शेतकरी तर आई पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंमसेविका आहे.
*** शहरातील सुप्रिम कॉलनीतील साईगु्रपच्या मंडळाचे गणेशभक्त नाशिराबाद रोडवरील मन्यारखेडा येथील तलावावर गणेश विसर्जन करण्यासाठी गेले होते. यावेळी अविनाश उर्फ भाचा ईश्वर कोळी (वय-२०) याचा विसर्जनावेळी अचानक पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले. अविनाश हा पाण्यात बुडाल्यानंतर पोहणार्यांच्या मदतीने त्याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. अविनाशला बाहेर काढल्यानंतर गणेश मुर्ती विसर्जन न करता बाजुला ठेवून त्याच गाडीत अविनाशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.
अविनाशला डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर त्याच्या मित्रमंडळी, त्याची आई व नातेवाईकांनी मनहेलवणारा आक्रोश केला. त्यानंतर नातेवाईकांनी दुपारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. याबाबत नाशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अविनाश याचा वडीलांचे निधन झाले असल्याने कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातच त्याचे निधन झाल्याने कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.