जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या मनातील वेदनांचा उद्रेक

0

जळगाव । राज्यासह जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी 1 जून पासून संपावर जाणार अशी घोषणा किसान क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. राज्यभरातील शेतकरी संपावर गेले. शेतकर्‍यांची कर्जमाफी, शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी संप पुकारला आहे. तालुकास्तरीय विभागात शेतकरी संघटनेच्या माध्यातून जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून संपाला सुरूवात झाल्यामुळे सकाळी कृउबा समितीत शेतकर्‍यांनी शेती माल विक्री साठी आणला नव्हता. त्यामुळे बाजारात लिलाव झाला नाही आणि परीसरात पुर्णपणे शुकशुकाट निर्माण झाला होता. भाजीपाला मार्केटमध्येमधे मात्र बंदचा कुठलाही असर दिसून आला नाही तर बाहेरगावी जाणारा भाजीपाला या ठिकाणी जास्त प्रमाणात लिलावात विक्रीसाठी आलेला दिसून आला होता. अमळनेरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवजी दौलत पाटील यांनी कृउबा समोर आणि चोपड्यात शेतकर्‍यांनी रास्ता रोको क, चाळीसगाव कृउबा समितीत निम्म्याहून कमी प्रमाणावर भाजीपाल्यांची आवक होती, विविध मागण्यासांठी पाचोरा येथील कसान क्रांतीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते, मात्र या संपाला एरंडोलात शेतकरी संपाला अल्प प्रतिसाद दिसून येत होता.

चोपड्यात शेतकर्‍यांकडून रास्ता रोको
चोपडा । संपूर्ण कर्ज माफी, मोफत वीज, दूधाला 50 रुपये भाव, शेतकर्‍यांना पेन्शन यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी गुरूवारपासून संपावर गेला आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अन्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाला सुरुवात झाली. चोपडा तालुक्यात पंकज नगर जवळ व गंलगी येथे सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान रास्तारोख करण्यात आले व सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्यात. यावेळी एस.बी.पाटील, संजीव बाविस्कर, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, भागवत महाजन, धनंजय पाटील, मेहमूद बागवान, मधुकर बाविस्कर, अजित पाटील, नारायण पाटील, जगदीश पाटील, समाधान पाटील, गुलाबराव पाटील, साठे, प्रकाश पाटील, रमेश सोनवणे, अनिल पाटील, विनायक सोनवणे यांचासह शेतकरी मोठ्यासंख्याने उपस्थित होते. पोलिस उपविभागिय अधिकारी सदाशिव वाघमारे यांचासह पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी बंदोबस्त ठेवला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रांतांना निवेदन
अमळनेर । तालुक्यातील शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी आज कृउबा समितीत शेती माल विक्रीसाठी आणला नाही तर शिवसेनेतर्फे कर्ज माफीसह इतर मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवजी दौलत पाटील यांनी बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन केले मात्र त्यांना तात्काळ अमळनेर पोलिसांनी अटक करून सुटका केली. अमळनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी पूर्णतः सहभाग घेतला नसून कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी 1 मे रोजी सकाळपासूनच आवक बंद असल्यामुळे व दिवसभरात एकही शेतकर्‍यांनी शेती माल विक्रीसाठी आणला नसल्याने शुकशुकाट होते. तर भाजीपाला मार्केटमध्येमधे मात्र बंदचा कुठलाही असर दिसून आला नाही तर बाहेरगावी जाणारा भाजीपाला या ठिकाणी जास्त प्रमाणात लिलावात विक्रीसाठी आलेला दिसून आला.तर सकाळी 10 ते 11 दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील व काही कार्यकर्त्यानी रास्ता रोको करण्यात आला होता. मात्र पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी त्यांना तात्काळ पोलिस कर्मचारी यांना सांगून ताब्यात घेतले व पोलिस स्टेशनला नेले व नतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

पाचोरा येथे ‘किसान क्रांती’च्यावतीने आंदोलनाचा इशारा
पाचोरा । तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी किसान क्रांतीच्या माध्यमातून सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले असून लवकर संपमागे न झाल्यास पुढील काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात राज्यभर ठिक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहे. 1जुन रोजी दुपारी 12 च्या सुमारास तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या वतीने महसूल अधिकारी नायब तहसीलदार श्री. मगर यांना किसान क्रांती च्या माध्यमातून सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी गुलाबराव पाटील, परमेश्वर पाटील (खेडगांव नंदिचे), सुनील पाटील (वाडी शेवाळे), अक्षय जैस्वाल (लोहारा), नंदु शेलकर, मनोज पाटील, मुकेश तुपे, निलेश पाटील(खडकदेवळा) दत्तु चौधरी(लोहारा)इंदल चव्हाण (जोगेतांडा), संतोष कोळी (दिघी), प्रशांत पाटील, चेतन पाटील, सागर पाटील (अंतुर्ली), दिपक कानडे, संतोष तांबोळी (अटलगव्हाण), शालिक जगताप (भोजे), विशाल पाटील (चिंचपुरा), विजय कलाल, रसुल तडवी, प्रकाश पाटील, बाबुराव खरे, (म्हसास), संकेत सिनकर (खडकदेवळा), अ‍ॅड. अमजद पठाण, शकील शेख (जारगांव), रविंद्र पाटील, अनिल पाटील (कोल्हे), विशाल राठोड,(कोकडी),श्री. कांबळे, बापु पाटील, आदी शेतकरी उपस्थित होते.

निवेदनात शेतकरींच्या विविध मागण्यांसह पाचोरा तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या दुष्काळ निधी बहुतेकांना अद्याप मिळाले नाही तो तात्काळ द्या तसेच तत्कालीन तहसीलदार दिपक पाटील यांनी सह्या केलेल्या जवळपास 20 गावांच्या शेतकरींना दिलेले अनुदानेचे धनादेश न वटवता गेल्या 14महिण्या पुर्वी पासून परत आल्यावर देखील नवीन धनादेश दिले नाही ते तातडीने द्या, शासनाने तातडीने संपावर मार्ग काढा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी पोलीस प्रशासन चे डिवायएसपी केशवराव पातोंड, एपीआय अविनाश आंधळे, सचिन सानप, पो. कॉ. प्रकाश पाटील सह पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता

चाळीसगावात भाजीपाल्याची आवक 50 टक्क्यांनी घटली
चाळीसगाव । चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर संपाचा परीणाम चांगल्याच पद्धतीने जाणवला असून रोजपेक्षा अर्ध्यावर भाजीपाला मार्केटमध्ये दाखल झाला तर निम्म्याहून कमी म्हणजे जवळपास 20 टक्केच कांदा व मक्का दाखल झाला आहे. दररोजची 40 ते 50 लाखाची उलाढाल असलेल्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हि उलाढाल निम्म्याहून कमी झाल्याने बाजार समितीचे जवळ पास 25 ते 30 हजाराचे उत्पन्न देखील कमी झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी देखील संपावर गेले असून दररोज येणारा भाजीपाला व आज 1 रोजी बाजार समितीत आलेला भाजीपाला यात अर्ध्यावर तफावत दिसून आली असून दररोज येणार कांदा व मका याच्या आवक वर देखील मोठा परिणाम झाला आहे. फक्त 15 ते 20 टक्केच हा माल मार्केटमध्ये आज दाखल झाल्याने तालुक्यातील अर्ध्यावर शेतकरी या संपत सहभागी झाले असल्याचे चित्र दिसून आले. बाजार समितीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दररोज येणार्‍या मालाची व बाजार समितीच्या उत्पन्नाची सरासरी 40 ते 50 लाखाची उलाढाल होत असल्याने आज ती उलाढाल चक्क अर्ध्यावर आल्याने समितीचे जवळपास 20 ते 25 हजार रुपयाचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार समितीमध्ये भाजीपाला सकाळी 5 ते 8 दरम्यान शेतकरी विक्री साठी आणतात आज 8 वाजेपर्यंत फक्त 50 टक्के भाजीपाल्याची आवक झाली आहे. दरम्यान तालुक्यातील भोरस फाट्यावर काही शेतकर्‍यांनी दुधाने भरलेल्या टँकर चा कॉक खोलून दिल्याने दूध रस्त्यावर सांडले होते. दरम्यान भाजीपाला विक्रेते रवी कोळी यांचे कडून माहिती जाणून घेतली असता आज भाजीपाला घेण्यासाठी बाजार समितीत गेलो होतो. मात्र कमी प्रमाणावर भाजीपाला आल्याने आम्हालाही कमी भाजीपाला मिळाला. भाजीपाल्याचे भाव आज नेहमीप्रमाणे स्थिर होते म्हणून आम्ही देखील दररोजच्या भावाप्रमाणे भाजीपाला विक्री केला असल्याचे त्यांनी सांगितले.

एरंडोलात शेतकरी संपाला अल्प प्रतिसाद
एरंडोल । राज्यव्यापी शेतकरी संपास एरंडोल येथे अल्पसा प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय महामार्गालगत असलेले भाजीपाला खरेदी केंद्र आज बंद होते.तर इतर सर्व कृषीमालाशी संबंधित व्यवहार सुरळीत सुरु होते. राज्यव्यापी संपाला तालुक्यात अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. कासोदा व एरंडोल येथील उपबाजार सुरु होते.दुध खरेदी व विक्री केंद्र देखील सुरु होते. तसेच दररोज भरणारा भाजीपाल्याचा बाजार देखील सुरु होता. राष्ट्रीय महामार्गालगत असलेले भेंडी, गोलभेंडी, गवार, खिरे ही खरेदी केंद्र मात्र बंद होती. या ठिकाणाहून दररोज आठ ते दहा वाहने मुंबई येथे भाजीपाला नेत असतात. मात्र संपामुळे रस्त्यावर वाहन अडवून भाजीपाल्याचे तसेच वाहनांचे नुकसान होईल या भितीमुळे आज भाजीपाला केंद्र बंद ठेवण्यात आले असल्याचे चालकांनी सांगितले.