डिसेंबरमध्ये आढळले 1294 रूग्ण, 1353 कोरोनामुक्त
जळगाव: सरत्या वर्षाच्या शेवटचा महिनाही जिल्हावासियांसाठी जिकरीचाच ठरला. डिसेंबर महिन्यात कोरोनामुळे 30 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. कोरोनाची लस आता दृष्टीपथात असली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सींग ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात 28 मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण आढळुन आला होता. त्यानंतर संपुर्ण जिल्हाभरात कोरोनाचा वेगाने प्रसार झाला. त्याला काही घटनाही कारणीभूत ठरल्या. अमळनेर, भुसावळ, जळगाव येथील कोरोना रूग्णांच्या अंत्ययात्रेमुळे या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला या विषाणूने आपल्या कवेत घेतले. जिल्ह्यात आत्तापर्यंत 55921 कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले आहे. तर 54 हजार 133 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मार्च ते डिसेंबर या कालावधीत 1329 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक जळगाव शहरातील 287 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीला 459 कोरोनाबाधित रूग्णांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.38 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 96.80 टक्के इतका आहे.
गेल्या 10 महिन्यापासून जिल्हा कोरोनाशी सामना करीत आहे. आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांकडुन कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. या काळात लॉकडाऊन देखिल करण्यात आले होते. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांकडुन कोरोना नियंत्रणासाठी हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सरत्या वर्षाच्या शेवटच्या म्हणजेच डिसेंबर महिन्यात 1294 रूग्ण आढळुन आले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला कोरोनाचा वेग मंदावला होता. मात्र महिनाअखेरीस पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. दि. 25 रोजी 35, दि. 26 रोजी 24, दि. 27 रोजी 33, दि. 28 रोजी 23, दि. 29 रोजी 38, दि. 30 रोजी 80 तर दि. 31 डिसेंबर रोजी 60 रूग्ण आढळुन आले. महिनाभरात 30 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1353 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
पुढील सहा महिने काळजीचे
जगभरात कोरोनाचा दुसरा स्ट्रेन आला आहे. भारतातही या नव्या स्ट्रेनचे रूग्ण आढळुन आले आहे. महाराष्ट्रात या नव्या स्ट्रेनचा एकही रूग्ण नसल्याचा सरकारने दावा केला आहे. केंद्र शासनाने सीरमच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. असे असले तरी पुढचे सहा महिने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या तीन गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणांकडुन वारंवार सुचना होऊन देखिल बाजारपेठांमध्ये एकाचवेळी होणारी गर्दी ही कोरोनाच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरू शकते.