भुसावळ- जिल्ह्यात श्री विसर्जनासाठी गेलेल्या चार गणेश भक्तांचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील रहिवासी व शिवसैनिक असलेले नितीन उखर्डू मराठे (32, दर्यापूर शिवार) हे श्रींच्या विसर्जनासाठी तापी नदीवर गेल्यानंतर पाय घसरल्यानंतर त्यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. सावदा पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडल्याने राजेंद्र लिलाधर पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार गणेश भालेराव तपास करीत आहेत. मराठे यांच्या पश्चात आई व वडील, मुलगी असा परीवार आहे. दुसर्या घटनेत अविनाश ईश्वर कोळी (वय 20, या.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाचा जळगावनजीक तलावात बुडून मृत्यू झाला तर तिसर्या घटनेत पळासखेडे बुद्रूक, ता.जामनेर येथे गणपती विसर्जन करतांना मनीष वामन दलाल (जामनेर) या युवकाचा तसेच भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिराचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रफुल्ल रमेश पाटील (रा.वलवाडी, ता.भडगाव) या विद्यार्थ्याचा श्री गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.