धायरी, मुंढवा, शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवडचाही समावेश
पुणे । पुणे जिल्ह्यात रस्त्यावर टाकलेली चार नवजात अर्भके सापडली आहेत. दोन मुली तर दोन मुले अशी ही अर्भके असून यातील दोन जिवंत तर दोघे मृत अवस्थेत आढळली आहेत. ही अर्भके कुठे रस्त्यावर टाकून दिलेली, कुठे गवतात लपवलेली, तर कुठे लिफ्टच्या डक्टमध्ये तर एक पुरलेल्या अवस्थेत आढळली आहेत. अनैतिक संबंधातून जन्मलेले, कुमारीमाता, मुलगी झाली म्हणून, आर्थिक अडचणी, दारिद्य्र किंवा अधिक अपत्ये सांभाळण्याची क्षमता नसणे या कारणांमुळे बालके टाकून दिली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धायरीतील समृद्धी प्राइड या सोसायटीत शनिवारी (दि.१६) डक्टमध्ये मुलीचे मृत अर्भक आढळले. दुसरा प्रकार मुंढवा येथील किर्तनबाग परिसरात (दि.१२) उघडकीस आला. या परिसरातील काळूबाई मंदिरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या गवतात दोन ते तीन दिवसांचे मुलाचे अर्भक उघड्यावर टाकल्याचे आढळले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला संगोपनासाठी ससून रुग्णालयाच्या ताब्यात दिले आहे.
आरोपींवर गुन्हे
या सर्व प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण फुलण्याआधीच संपवण्यात येणार्या या कोवळ्या जिवांचा यामध्ये दोष काय? मूल सांभाळणे शक्य नसेल त्याला कुठेही टाकण्यापेक्षा अशा बालकांना बालसंगोपन करणार्या संस्थेच्या ताब्यात देणे कधीही योग्य ठरेल.
संगोपनासाठी श्रीवत्स संस्थेच्या ताब्यात
तिसरी घटना शिवाजीनगर परिसरातील दळवी रुग्णालय येथून उघडकीस आली. या रुग्णालयाच्या आवारात (दि.२) आठ ते नऊ दिवसांचे मुलाचे जिवंत अर्भक सापडले होते. अज्ञात महिलेने अनैतिक संबंधातून जन्मलेले अथवा पालनपोषण करण्यास असमर्थ असल्या कारणाने हे अर्भक टाकून दिल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या अर्भकास शिवाजीनगर येथील बाल कल्याण समितीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यास श्रीवत्स संस्था ससून रुग्णालय यांच्या ताब्यात संगोपनासाठी दिले आहे.
अर्भकाला खोदून बाहेर काढले
चौथी घटना पिंपरी-चिंचवड शहरातील असून देहूरोड-आकुर्डी दरम्यान असलेल्या रेल्वे रुळाशेजारी दोन अज्ञात स्त्रियांनी तीन महिन्यांचे मुलीचे अर्भक पुरल्याचे उघड झाले होते. शुक्रवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात महिलांना रेल्वे रुळाजवळ काहीतरी खोदत असताना एका नागरिकाने पाहिले होते. त्या नागरिकाला याचा संशय आल्याने त्याने शनिवारी (दि.१६) देहूरोड पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत अर्भकाला खोदून बाहेर काढले.