शेंदुर्णी । खान्देशाचे आराध्यदैवत प्रतिपंढरपूर शेंदुर्णी येथील भगवान श्री त्रिविक्रम मंदिरात गेल्या 275 वर्षाहून अधिक काळापासून दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो भाविक श्री त्रिविक्रमाच्या रुपात साक्षात श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीला पूजेसाठी रात्री 12 वाजे पासून 2 वाजेपर्यंत रांगा लागलेल्या असतात. आषाढीची सर्व तयारी मंदीर संस्थानातर्फे करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनासाठी अडचण येऊ नये तसेच कायदा सुव्यवस्था राखला जावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, हनुमंतराव गायकवाड, उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांनी तसेच जळगाव, जामनेर येथुन अतिरिक्त पोलीसांना प्राचारण करण्यात आले आहे. आषाढीच्या पुर्वसंध्येला पाऊस येता अशी समज परिसरातील नागरिकांची आहे. सोमवारी दिवसभर पाऊस झाल्याने ही समज खरी ठरली आहे.
चाळीसगावात विविध कार्यक्रम
चाळीसगाव। शहरातील हंस टॉकीज जवळील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निम्मित सकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत महापूजा फराळ वाटप, पालखी सोहळा व भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. आषाढी निम्मित या मंदिराची सजावट सोमवारी 3 रोजी पासून करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक लाईटची रोषणाई सजावट करण्यात आली आहे. दूध दही व पंचामृताने अभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर महापूजा होणार आहे. सकाळी 8 वाजे नंतर आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करून सकाळी 11 वाजेपासून भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 6 वाजता विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींची पालखी मंदिरापासून निघणार आहे.
पिंपळगाव हरेश्वरात जय्यत तयारी
पाचोरा। तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर हे भगवान महादेवाचे जागृत देवस्थान म्हणून संपुर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. गावाच्या पूर्वकडील बहुळा नदीच्या काढी विठ्ठल भक्त गोविंद महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात्रोत्सवाची तयारी पुर्ण झाली आहे. सामाजिक संस्था, युवक मंडळ दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी निवास, भोजन, चहा-फराळाची व्यवस्था करतात. पिंपळगाव हरेश्वर येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. मात्र या दिवशी यात्रा असल्याने बाजार सोमवारी भरणार आहे.