पुणे । पावसामुळे जिल्ह्यात साथीच्या रोगांचा प्रदुर्भाव वाढला आहे. चार महिन्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे 124 रूग्ण आढळले आहेत. मुळशी, हवेली, भोर, बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मे ते ऑगस्ट दरम्यान हे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली आहे.
मे महिन्यात मुळशी तालुक्यामध्ये डेेंग्यूचे 8 रूग्ण आढळून आले होते. तर जूनमध्ये हवेली तालुक्यात खेडशिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार 8 रूग्ण डेंग्यूचे आढळले. वाडेबोल्हाई केंद्रात 17 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. तसेच जून महिन्यात भोर तालुक्यातील आंबवर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 जणांंना चिकुनगुनियाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली. तसेच आपटी उपकेंद्रांतर्गत 52 जणांना चिकुनगुनियाची लागण झाली होती. तसेच जुलै महिन्यात बारामती तालुक्यातील मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात चिकुनगुनियाचे 7 रुग्ण आढळून आले होते. तर तरडोली उपकेंद्रात डेंग्यूचे 15 रुग्ण आढळले होते. तर हवेली तालुक्यातील सांगरूण प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. मागील तीन ते चार महिन्याच्या कालखंडात जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यूचे 51 रुग्ण तर चिकुुनगुनियाचे 73 रुग्ण आढळले होते.
विशेष मोहिम
जिल्हा प्रशासनाच्यावतीने डेंग्यू आणि चिकुनगुनिया रोगावर नियत्रंण ठेवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. भित्तीपत्रके, जनजागृती करण्यात येत आहे. डासांपासून बचाव करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
-डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी