जळगाव । केंद्र शासनाच्यावतीने गेल्या चार वर्षापासून विविध लोकोपयोगी योजना राबविण्यात येत असून नागरीकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्यासाठी लवकरच पोस्ट विभागामार्फत देशात पोस्टल बँक सुरु करण्यात येणार असून अमळनेर व चाळीसगाव येथे पोस्टल बँक सुरु होणार असल्याची माहिती खासदार ए. टी. नाना पाटील यांनी दिली.
पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन
भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश सेवा) यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील ऑफिसच्या बाजूला असलेल्या पोस्ट खात्याच्या क्वार्टरमध्ये डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन खासदार ए. टी. (नाना) पाटील यांच्याहस्ते झाले, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार सुरेश भोळे, मुंबई येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार, अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा, डाक अधीक्षक बी. व्ही चव्हाण, शिवाजी पाटील आदि उपस्थित होते.
9 वर्षांपासून पासपोर्ट केंद्रासाठी पाठपुरावा
या बँकेच्या शाखा पहिल्या टप्प्यात अमळनेर व चाळीसगाव येथे सुरु होणार असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे यासाठी सन 2009 पासुन प्रयत्न करीत होतो. शासन नागरीकांच्या दारी या उपक्रमातंर्गत जळगाव शहरात उडान योजनेतंर्गत विमानसेवा सुरु करण्यात आली. आता पासपोर्ट सेवा केंद्रही सुरु झाले आहे. जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळावी. यासाठी जिल्ह्यात भुदल व नौदलाची विशेष भरती मोहिम राबविण्यात आली. चाळीसगाव येथे सैन्य भरती केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची होणार सोय
जळगाव जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर असून देशात होणार्या प्लॅस्टिक उत्पादनापैकी 16 टक्के उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात होते. तसेच जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी विदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यक भासत असत. त्यावेळी त्यांना मुंबई, औरंगाबाद, नाशिक येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. आता जळगाव शहरात डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाल्याने या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. सुनंदा चौधरी यांनी स्वागतगीत म्हटले. आभार अतिरिक्त क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी तुलशीदास शर्मा यांनी मानले. याप्रसंगी सभापती पोपट तात्या भोळे, नगरसेवक उज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह पासपोर्ट विभाग, डाक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
नोडल पार्सल सेंटर सुरु करणार
विदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांबरोबरच हज यात्रेस जाणार्या यात्रेकरुना या सेवाकेंद्राचा लाभ होणार आहे. औरंगाबाद डाक विभागातील हे 5 वे सेवा केंद्र आहे. जळगाव डाक कार्यालयामार्फत लवकरच नोडल पार्सल सेंटर सुरु करण्यात येणार असून या सेंटरच्या माध्यमातून नागरीकांना घरपोच पार्सल सेवा देण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद डाक क्षेत्राचे पोस्टमास्टर जनरल प्रणव कुमार यांनी दिली.