मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
जळगाव, दि. २३ – जळगाव जिल्ह्यात १४ हजार १६३ दिव्यांग मतदार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढला पाहिजे. यासाठी कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या प्रकारचे दिव्यांग असलेल्या किती व्यक्ती आहे, याची सविस्तर माहिती संबंधितांनी तयार करुन ठेवावी. त्यानुसार त्यांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी वाहन व्यवस्था करणे, त्यांना सहाय्यकाची आवश्यकता भासणार असल्यास तशी माहिती संकलीत करणे, त्यांना मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, मदत कक्ष निर्माण करणे, एकाच मतदान केद्रावर अधिका दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांना आणण्यासाठी म्ब्युलन्सची व्यवस्था करणे, त्यांचेसाठी मतदान केंद्रावर निवार्याची व्यवस्था करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी आज एका बैठकीत दिले.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक आयुक्त (प्रशासन) उन्मेष महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुकाअ संजय मस्कर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेसह जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त श्री. माने म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने या निवडणूकीपासून दिव्यांग मतदारांना विशेष दर्जा दिला आहे. विभागीय आयुक्त माने यांनी जिल्ह्यातील एकूण मतदार, मतदान केंद्र, सहाय्यकारी मतदान केंद्र, उपलब्ध मनुष्यबळ, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन, स्ट्रॉगरुम, मतदान कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त् मास्टर ट्रेनर, वाहतुक आराखडा आदिंची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडून जाणून घेतली. त्याचप्रमाणे मागील लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्यावेळी दाखल गुन्ह्यांची माहिती, क्रिटीकल मतदान केंद्राची माहिती, नेट कनेक्टिव्हीटी मिळत नसलेली मतदान केंद्र, जमा करण्यात आलेली शस्त्र त्याचबरोबर आचारसंहिला लागू झाल्यानंतर काढण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर केलेली कार्यवाही याचाही आढावा घेतला. मतदान कर्मचार्यांना देण्यात येणार्या प्रशिक्षणाच्यावेळी सहाय्यक मतदान अधिकारी यांनी स्वत: उपस्थित राहण्याच्या सूचना करुन विधानसभा मतदार संघनिहाय गावांची संपर्क सूची तयार करावी. गावांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करावीत.
जिल्ह्यात चोपडा तालुक्यात५ तर रावेर तालुक्यात ६ मतदान केंद्रावर मोबाईल नेटवर्क नसल्याने त्याठिकाणी पोलीस वॉकीटॉकीचा वापर करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात ५५५ व्यक्तींकडून त्यांची शस्त्रे जमा करण्यात येणार असून आतापर्यंत ३१२ शस्त्र जमा झाली असून उर्वरित शस्त्रे लवकरात लवकर जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ईव्हीएम स्ट्राँग रुम सिलींग व सेटींगच्या कार्यवाहीबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बैठकीत दिली.