प्रशासनाच्या मतदार नोंदणी मोहीमेला प्रतिसाद
जळगाव- लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे नवमतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर २५ मार्चपर्यंत नावनोंदणी न झालेल्या मतदारांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये शेवटच्या पुरवणी यादीत २५ हजार नवमतदारांची नावनोंदणी झाली असून, यात सर्वाधिक मतदार जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात वाढले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून मतदार नोंदणीप्रक्रिया सुरू होती. नोंदणीप्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक विभागातर्फे ३१ जानेवारीला मतदारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही नवमतदारांची नावनोंदणी करण्यासाठी पहिली पुरवणी यादी तयार करण्यात आली. या यादीत जिल्हाभरातील सुमारे २७ हजार नवमतदारांचा समावेश झाला होता. दरम्यान, आता नवीन मतदारांची अंतिम पुरवणी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ३० हजार नवमतदारांचा समावेश झाला होता. मात्र, पूर्वीच्या यादीतील पाच हजार मतदार डिलीट’ झाल्याने नवीन यादीत २५ हजार मतदारांचा समावेश झाला आहे.
जिल्ह्यात ३४ लाखाहून अधिक मतदार
जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र मतदारांची पुरवणी यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या मतदारांची यादी मिळून जिल्ह्यात लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघात ३४ लाख ३० हजार ७६० मतदार आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय वाढीव मतदार
चोपडा- १,९६८, रावेर- १,९४१, भुसावळ- ३,१६५, जळगाव शहर- ४,३७९, जळगाव ग्रामीण- २,००४, अमळनेर- २,६५४,एरंडोल- ३,२४४, चाळीसगाव- २,६५९, पाचोरा -४,२०८, जामनेर- २,१६८, मुक्ताईनगर- २,१८७ एकूण- २५,४९२