जिल्ह्यात 1 लाख 47 हजार 630 लोकांना 457 कोटींचे मुद्रा कर्ज

0

जळगाव । केंद्र सरकारने मुद्रा कर्ज योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 47 हजार 630 लोकांना 457 कोटी 86 लाखांच्या मुद्रा कर्जाचे वाटप करण्यात आलेले आहे. यंदा जिल्ह्यात प्रत्येक बँकेला दर महिन्याला 15 कर्जप्रस्तावांच्या मंजुरीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे.यंदा केंद्र सरकारने या योजनेसाठी 20 हजार कोटींची तरतूद केलेली आहे, अशी माहिती आज येथे झालेल्या तालुकास्तरीय मुद्रा कर्ज मेळाव्यात देण्यात आली. केवळ मेहनतीवर विश्‍वास ठेवणार्‍या गरजू व्यापारी, लघुउद्योगांना उत्थानाची संधी देणारी ही योजना म्हणजे फक्त पैसा हडपण्याची नव्हे, तर बँकांमध्ये पत वाढविण्याची संधी समजूून या योजनेचे सोने करा, असा सल्ला मान्यवरांनी या मेळाव्यात इच्छूक लाभार्थ्यांना दिला. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, एचडीएफसी बँकेचे जैन, जिल्हा अग्रणी बँकेचे मराठे व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अरुण खैरनार यांनी या मेळाव्यात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

बँकांचे समाधान महत्वाचे
लाभार्थ्याला जो व्यवसाय, उद्योग करायचा आहे त्याची शॉप अ‍ॅक्टसारख्या तत्सम नियमानुसार नोंदणी गरजेची आहे. त्यासोबतच व्यवसायानुरुप बँका सांगतील त्याप्रमाणे लाभार्थ्याने कागदपत्रांची पूतर्ता करणे व परतफेडीच्या हमीसह अनुषंगिक मुद्द्यांवर बँकांचे समाधान होणेही महत्वाचे आहे. या योजनेत खेळत्या भांडवलासह पायाभूत भांडवलासाठीही कर्ज दिले जाते.स्वतंत्र व्यक्ती, दुकानदार, फेरीवाले, ब्युटी पार्लर, ट्रान्सपोर्ट, भागीदार संस्था, अन्नसेवा, बचतगट, उत्पादक संस्था, व्यावसायिक सेवा पुरवठादारांनाही या योजनेत कर्ज दिले जाते, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मराठे यांनी दिली.

नियमित परतफेडीनेच प्रगती
कोणतेही कर्ज देताना बँका कर्जदाराचा पूर्वेतिहास बारकाईने लक्षात घेतात.तो चांगला असला की कर्ज मिळण्यात अडचणी येतच नाहीत.परतफेड नियमित ठेवा.त्यामुळे पुढचे कर्ज सहज व जास्त मिळते. पुन्हा कर्ज देण्यासाठी विश्‍वासार्हतेला महत्व देत बँकाच स्वत: पुढाकार घेतात. कर्जाची नियमित परतफेड हीच प्रगतीची खरी वाट ठरते, असे यावेळी एचडीएफसी बँकेचे जैन व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अरुण खैरनार यांनी सांगितले. अखेरच्या टप्प्यात उपस्थितांनी  विचारलेल्या प्रश्‍नांना अधिकार्‍यांनी उत्तरे दिली. अपूर्व वाणी यांनी या मेळाव्याचे सुत्रसंचालन केले.

सिन्नरची चटणी, पिंपळगावच्या पोळ्या निर्यातक्षम!
यावेळी अत्यंत पोटतिडकीने इच्छुकांचा उत्साह वाढविणार्‍या भाषणात जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतला तयार होणार्‍या पोळ्या विदेशात निर्यात होतात. त्या तीन महिने टिकतात. सिन्नरला तयार होणारी चटणीही निर्यात केली जाते. या जिल्ह्यातही असे प्रकल्प उभे करणारे लोक पुढे आले पाहिजेत. एकसारखेच उत्पादन किंवा काम करणारे किमान 10 ते 30 उद्योजक एकत्र येऊन मोठा उद्योग उभा करत असतील तर त्यांना 5 कोटी रुपये अनुदान देणारीही योजना सरकारकडून राबविली जाते, या क्लस्टर योजनेप्रमाणे 8 ते 10 प्रकल्प या जिल्ह्यात सुरु झाले पाहिजेत.केळी , बटाट्याच्या वेफर्ससारख्या अन्न प्रक्रीया उद्योगात अजूनही मोठ्या संधी आहेत. त्याचा विचार या जिल्ह्यातील नवोदितांनी करावा, आमच्यासह बँकाही त्यांना साथ देतील, असेही ते म्हणाले.