जिल्ह्यात 158 मद्य दुकानांचे टाळे उघडले; तळीरामांना दिलासा

0

भुसावळ । महामार्गावरील 500 मीटर आतील देशी-विदेशीसह परमीटरूम बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात 1 एप्रिलपासून मद्य दुकानांना टाळे लागले होते मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ.अश्‍विनी जोशी यांनी 4 सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशानंतर महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील मद्य दुकाने खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 5 सप्टेंबर रोजी ड्राय डे आल्याने या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसलीतरी 6 रोजी जिल्ह्यातील तब्बल 158 मद्य दुकानांचे टाळे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर उघडल्याने मद्यपींसह दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव महापालिका क्षेत्रातील 55 तर जिल्ह्यातील अन्य पालिकेतील तब्बल 103 मद्य दुकाने सुरू झाली आहेत. सुरू झालेल्या दुकानांमध्ये देशी-विदेशी दारूची विक्री करणारे वाईन शॉप, परमीटरूमचा समावेश आहे. भुसावळ शहरात तब्बल 47 दुकानांना टाळे लागले असलेतरी त्यातील 30 दुकाने बुधवारी सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात गर्दी
भुसावळ शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात परवाने नूतनीकरणासाठी मद्य व्यावसायिकांनी गर्दी केली होती. सायंकाळी शहरात उघडलेल्या परमीट रूमसह वाईप शॉपवर तळीरामांची चांगलीच गर्दी झाल्याचे चित्र होते.

महामार्गावरील दारु दुकाने बंद करण्यात याव्यात अशा याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. अशा शेकडो याचिकांचा विचार करता न्यायालयाने दारु दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयात शहरी हद्दीतून जाणार्‍या महार्गावरील दारु दुकाने बंद करण्याचा देखील निर्णय झालेला होता. कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय रद्द न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. शासनाच्या महसूलपेक्षा प्रवाशांचा जीव महत्वांचा असल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मात्र नव्याने दारु दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने धोकेदायक असून गुन्हेगारी वाढण्यास प्रोत्साहीत करणारा आहे. या विरोधात येत्या आठवड्याभरात आंदोलन करु.
– डॉ.राधेश्याम चौधरी (जळगाव फर्स्ट अध्यक्ष)

जळगाव जिल्ह्यात महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील 153 मद्य दुकाने पूर्ववत सुरू करण्यात आली आहेत.
-एस.एल.आढाव
(अधीक्षक- राज्य उत्पादन शुल्क विभाग)