जिल्ह्यात 162 अभ्यासिकांचा विद्यार्थ्यांना लाभ

0

धुळे । मानव विकास कार्यक्रमांतर्गत 2017-18 या वर्षात जिल्ह्यात 162 अभ्यासिका सुरू आहेत. त्याचा जिल्ह्यांतील 5298 विद्यार्थी लाभ घेत आहेत. या अभ्यासिकांसाठी 14 लाख 58 हजार रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयातून मिळाली आहे. मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारित योजना राबविणे या पार्श्‍वभूमिवर 2011-12 व 2012-13 मध्ये मंजुरी दिलेल्या अभ्यासिकांपैकी ज्या अभ्यासिका 2017-18 मध्ये सुरू आहेत. त्या अभ्यासिकांसाठी व्यवस्थापक व सेवक तसेच इतर खर्चाच्या आर्थिक तरतुदीसाठीचा संबंधित अधिकार्‍यांचा अहवाल मिळाला आहे.

अभ्यासिकेचा कालवधी जुलै ते मार्च
शहरी भाग वगळून जिल्हयातील धुळेसह साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील काही प्रमुख गावांमध्ये या अभ्यासिका सुरू आहेत. अभ्यासिकेचे कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी अभ्यासिकेत व्यवस्थापक व सेवकयांची नियुक्ती करण्यात येते. एका अभ्यासिकेतील व्यवस्थापक व सेवक मिळून 7 हजार व इतर खर्च 2 हजार असा एकूण 9 हजार रूपये साधारणत: दरवर्षाला खर्च येत असतो. यासाठी 14 लाख 58 हजार रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. यात 11 लाख 34 हजार व्यवस्थापक व सेवकांच्या मानधनावर तर 3 लाख 24 हजार रूपये इतर खर्च अपेक्षित आहे. या अभ्यासिकांचा कालावधी जुलै ते मार्च असा 9 महिन्यांचा असतो. या अभ्यासिकांचा लाभ जिल्ह्यातील 5हजार 298 विद्यार्थी घेत आहेत. यात धुळे तालुक्यातील 1206, साक्री तालुक्यातील 1818, शिंदखेडा तालुक्यातील 1642 व शिरपूर तालुक्यातील 632 विद्यार्थी लाभ घेत असल्याचे सांगण्यात आले.