जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रियेत काल रात्री उशिरापर्यंत अर्जांची छाननी सुरू होती. त्यात 19 हजार 983 अर्ज वैध तर 288 अर्ज अवैध ठरले. आता लक्ष उमेदवारी माघारीकडे लागले आहे. चार जानेवारीस अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे. त्या किती उमेदवार माघारी घेतात, किती बिनविरोध होतात याकडे उमेदवारांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. 30 डिसेंबरपर्यंत 7 हजार 213 जागांसाठी एकूण 20 हजार 271 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांची छाननीची प्रक्रिया काल झाली. त्यात काही उमेदवारांच्या अर्जावर अनेकांनी हरकती घेतल्याने छाननी दरम्यान वैध, अवैध अर्जांची संख्या सर्वच तहसिल कार्यालयातून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली नव्हती. ती आज प्राप्त झाली आहे.त्यात 20 हजार 271 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 19 हजार 983 अर्ज वैध, तर 288 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
ग्रामीण भागात ग्रामपंचायती निवडणुकीचा रंग आता चांगलाच चढला आहे. अनेक गावांमध्ये दुरंगी, तिरंगी लढतीची चिन्हे तर काही ठिकाणी उमेदवारांनी पॅनलच्या माध्यमातून न लढता स्वतंत्रपणे लढविण्यावर भर दिला आहे. ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की गावातील भाऊबंदकी कामा येते. कोणत्या पक्षाकडे कोणाचा कोण गेला, कोण तिकडे गेला, कोणाचे मुंबईत वजन आहे, कोण खासदाराचा, आमदाराच्या, नेत्यांच्या जवळ आहे. याच्या चर्चा घडू लागल्या आहेत. निवडणूकीत कोणत्या नेत्याला बोलावयाचे, अधिकाधिक मते आपल्याच पॅनलला मिळण्यासाठी डावपेच कसे आखायचे, याचे नियोजन आता सुरू झाले आहे. आपल्या विजयासाठी कोणाला माघारी घ्यावयास लावायची, त्याने माघार घेतली नाहीतर इतर काय पर्याय आहेत याचाही शोध सुरू झाला आहे.