पुणे । राज्य शासनातर्फे राबविण्यात आलेल्य वृक्ष लागवड मोहिमेत महाराष्ट्रात 4 कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील वृक्षप्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यात उद्दीष्टापेक्षा एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. महोत्सव संपल्यानंतरही विविध संस्थांनी वन विभागाकडून तब्बल 83 हजार रोपांची लागवड केली.
पुणे जिल्ह्याकडे 22 लाख 10 हजार रोपांच्या लागवडीची जबाबदारी देण्यात आली होती. राज्याचे वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पुण्यात आढावा बैठकही घेतली होती. एकट्या पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 2 लाख रोपांची लागवड केली. रोपांची लागवड केल्यानंतर वन विभागाच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करणे आवश्यक होते. त्यानुसार 7 जुलैपर्यंत 23 लाख 77 हजार 442 रोपांची लागवड केल्याची नोंद झाली आहे. मात्र, जिल्ह्यात सुमारे 24 लाख रोपांची लागवड झाली आहे, असे वन विभागाचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.
वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत कडूलिंब, खैर, आवळा, जांभूळ,अर्जुन, काशीद, हिरडा, रिठा, मोहा, बेल, करंज, बोर, शिसू, शिसम, चिंच, अंबा, सिताफळ, कवठ, आपटा आदी रोपांची लागवड करण्यात आली. 3 ते 6 फुटांपर्यंतच्या रोपांची लागवड करण्यास प्राध्यान्य देण्यात आले.
केवळ 12 हजार रोपांची विक्री
पुणे शहरात तीन ठिकाणी स्वस्त दरात रोपांची विक्री करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून त्यास हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. 1 ते 7 जुलै या कालावधीत केवळ 12 हजार रोपांची विक्री झाली. शाळांसाठी 50 पैसे, 60 पैसे व 1 रुपया दराने विविध रोपांची विक्री करण्यात आली. तर सर्वसामान्य नागरिकांना 6 ते 15 रुपये दराने रोपांची विक्री करण्यात आली.
महोत्सवानंतरही 57,250 रोपांची विक्री
महोत्सवानंतरही टाटा पॉवर संस्थेने 2 हजार 500, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानने 1 हजार, तळेगाव एमआयडीसीने 5 हजार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 47 हजार तर पुरात्तत्व विभागाने 1 हजार 750 रोपे लागवडीसाठी घेतली आहेत, असेही रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.