जिल्हा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज, नऊ तालुक्यातील 294 गावातील 31 हजार 117 शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे 30 हजार 260.95 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक 16 हजार 19.70 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. एकूण नऊ तालुक्यातील 294 गावातील 31 हजार 117 शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जिल्हा कृषी विभागाने याबाबतचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.
मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ते 33 टक्क्यांवर आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. सर्वाधिक 7 हजार 100 हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल 6 हजार 777 हेक्टरवरील गव्हाला, तर पाच हजार 870 हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
मंगळवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील 92 गावांमधील 20691 शेतकर्यांच्या 3832 हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले असून, 3787 हेक्टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे 2088 हेक्टरवरील केळी, 2076 हेक्टरवरील हरभरा, 1672 हेक्टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. यासोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यातील 33 गावांमध्ये 3452 शेतकर्यांचे 7826 हेक्टरवर तर अमळनेर तालुक्यातील 44 गावांमध्ये 4613 शेतकर्यांंचे 3589.91 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.