जिल्ह्यात 64 हजार 70 विद्यार्थी देणार मंगळवारपासून दहावीची परीक्षा

1

१३४ केंद्रावर ३ मार्चपासून परीक्षा; बैठे पथकासह ६ फिरते पथक

जळगाव : बारावीच्या परिक्षा सुरू असतांना उद्या दि.3 मार्च पासून दहावीच्या परिक्षांना प्रारंभ होणार असून यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.जिल्ह्यातून 64 हजार 70 विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले असून 134 केंद्रावर ही परिंक्षा होणार आहे.यात 20 परिक्षा केंद्र उपद्रवी असल्याने या केंद्रावर पथकांची करडी नजर असणार आहे.

दहावीच्या परीक्षांना 3 मार्चपासून इंग्रजीच्या पेपरने सुरूवात होणार आहे. नाशिक मंडळातून 2 लाख 16 हजार 444 विद्याार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ आहे. केंद्रावर कॉपीचा वापर होत असल्याने या परीक्षेसाठी देखील प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक असणार आहे. तर जिल्हास्तरावरून 6 पथक तैनात करण्यात आले आहे.जिल्ह्यातून 134 केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून तयारी पुर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्यात 20 केंद्र उपद्रवी असल्याने या केंद्रावर बंदोबस्त ठेवला जाणार आहे.या केंद्रावर विषेश नजर असणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शाळा सकाळ सत्रात भरणार

उन्हाळा सुरू झाला असल्याने प्राथमिक शाळांप्रमाणेचे माध्यमिक शाळा देखील दि.2 मार्चपासून सकाळ सत्रात भरविण्यात येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत शाळेची वेळ निश्चित करण्यात आली असून यासाठी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी पत्र जारी केले आहे. त्यामुळे आता माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात होणार आहे.

केंद्र संचालकांची आज बैठक

दहावी परिक्षेच्या पार्श्वभूमीवर बेंडाळे कॉलेज येथे धांडे हॉल मध्ये आज दि.1 रोजी केंद्र संचालकांची बैठक दुपारी 2 वाजता होणार आहे. यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे केंद्रसंचालकांना मार्गदर्शन करणार आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्र संचालकांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.