जिल्ह्यात 75 हजार हेक्टर्स सिंचन क्षमता वाढली

0

जळगाव । टंचाईसदृश्य परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याबरोबरच राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनाने सर्वांसाठी पाणी- टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जल्हयात जलयुक्त शिवार हे अभियान व्यापक स्वरुपात व प्रभावीपणे राबविण्यात येत असून या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 52 हजार 442 टी.सी.एम. पाणीसाठी निर्माण झाला आहे. यातून 74 हजार 991 हेक्टर क्षेत्राला एक वेळ संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे. तर 232 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण झाली आहे. तसेच जिल्हयात आतापर्यंत 10 हजार 859 कामे पूर्ण झाली आहे.

121.56 कोटी रुपयांचा आराखडा तयार
जिल्हयात गेल्या दोन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कामांमुळे हे अभियान दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. जिल्हयात सन 2015-16 मध्ये या अभियानातंर्गत 232 गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये जलसंधारण व इतर प्रकारची 7 हजार 316 कामे करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 7 हजार 138 कामे पूर्ण झाली तर 178 कामे प्रगतीपथावर आहे. या कामांमध्ये गाळ काढणे, खोलीकरण व रुंदीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी 121.56 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. करण्यात आलेल्या कामांवर डिसेंबर 2016 पर्यंत 119.49 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या अभियानात निवड झालेल्या गावांपैकी 228 गावांतील कामे 100 टक्के पूर्ण झाली आहे. तर 4 गावातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या कामांच्या माध्यमातून जिल्हयात 36 हजार 118 टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली आहे. या साठवण क्षमतेमुळे 58 हजार 667 हेक्ट्र क्षेत्राला एक वेळ तर 29 हजार 333 हेक्टर क्षेत्राला दोन वेळेस पाणी देता येणार आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे 232 गावांपैकी 8 गावे 100 टक्के ठिबकखाली आणण्यात यंत्रणेला यश आले आहे.