पुणे । जिल्ह्यात 185 आधार केंद्रे सुरू झाली आहेत. परंतु 100 आधार मशीन नादुरुस्त असल्याने ती दुरुस्त करण्याची मागणी महाऑनलाईनकडे करण्यात आली आहे. तसेच महाऑनलाईन शिवाय खाजगी ऑपरेटर्सना आधार केंद्र देण्याची परवानगी शासनाकडे मागीतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राव यांनी आधार केंद्राबाबत माहीती दिली. सध्या 100 आधार मशीन नादुरुस्त असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरुस्त करण्यासंदर्भात शासनाकडे परवानगी मागितली आहे. दुरुस्तीचा खर्चदेखील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच करू, असा प्रस्ताव डायरेक्टर ऑफ आय. टी. यांच्याकडे पाठविला असून परवानगी मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मशीन दुरुस्त करून लवकरात लवकर आधार केंद्र सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
नागरीकांना शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे असून सध्या आधार कार्ड काढण्यासाठी अडचणी येत आहेत. जिल्ह्यात तसेच शहरात अनेक ठिकाणी पुरेशा प्रमाणात आधार केंद्र नसल्यामुळे नागरीकांना आधार कार्ड काढणे जिकीरीचे झाले आहे.
ज्येष्ठ नागरीकांची घरीच होणार नोंदणी
सध्या नागरीकांच्या सुविधेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आधार केंद्र सुरू केले असून येत्या काही काळात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हापरिषद कार्यालय, येथे आधार केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. ज्येष्ठ नागरीक तसेच रुग्णांकरीता त्यांच्या घरी जाऊन आधार नोंदणी करता यावी यासाठी सुविधा करून देण्यात आली आहे. या सुविधेसाठी 400 रुपयांचे शुल्क आकाराण्यात आले असून ज्येष्ठ नागरीक आणि रुग्ण या सेवेचा लाभ घेऊ शकतात, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी माहीती दिली.