जिल्ह्याला दुष्काळाची झळ

0

25 गावांसह 271 वाड्या-वस्त्यांमध्ये 38 टँकरने पाणीपुरवठा

पुणे : जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची दाहकता वाढू लागली असून, राज्यातील सुमारे 180 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पुणे विभागातील 100 दुष्काळी गावांमध्ये 100 टँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात सर्वाधिक 31, तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात 15 आणि शिरूरमध्ये 11 टँकर सुरू आहेत. विभागातील 1 लाख 82 हजार 260 नागरिक दुष्काळाने बाधित असून, बाधित जनावरांची संख्या 19 हजार 901 आहे. पुणे जिल्ह्यातील टँकरची संख्या 30 वरून 38 झाली आहे. सर्वाधिक टँकर बारामती तालुक्यामध्ये सुरू करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका वगळता पुरंदर, भोर, बारामती, इंदापूर, शिरूर, खेड, आंबेगाव, दौंड, जुन्नर, वेल्हा, हवेली, मुळशी या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्याच भागात आता दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. ऐन हिवाळ्यात जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जानेवारीनंतर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती कशी असेल याचा अंदाज करणे अवघड जात आहे.

टँकरची मागणी वाढली

जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांसह वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे. पाणीपुरवठा उपलब्ध नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून पाण्याच्या टँकरची मागणी होत आहे. या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

बारामतीत 15 टँकर

पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत चालली आहे. विभागात 6 डिसेंबर रोजी 91 टँकर सुरू होते, तर 10 डिसेंबर रोजी टँकरची संख्या 100 वर गेली. सध्या 100 गावे आणि 676 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात माणमध्ये 31, खटावमध्ये 5 तर कोरेगावमध्ये 1 आणि फलटण येथे 2 टँकर सुरू आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. भविष्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जवळपास 12 गावे तसेच 131 वाड्यावस्त्यांवर 15 टँकरनी पाणीपुरवठा सध्याच्या स्थितीत सुरू आहे. बारामातीपाठोपाठ शिरूरमध्ये सर्वाधिक 11 टँकर सुरू आहेत. शिरूर तालुक्यातील 5 गावे आणि 46 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. दौंड तालुक्यातील 7 गावे आणि 63 वाड्यावस्त्यांसाठी 7 टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच, पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी 2 आणि आंबेगावमध्ये 1 असे एकूण 38 टँकर सुरू आहेत. सांगलीत खानापूर येथे 3, आटपाडीत 8, जतमध्ये 4, कवठे महांकाळ येथे 2 आणि तासगाव येथे 1 टँकर सुरू आहे. तसेच, सोलापूर जिल्ह्यात माढा येथे 3 आणि करमाळा तालुक्यात 2 टँकर सुरू आहेत.

पाणीटंचाईचे संकट

जिल्ह्यात आंबेगाव, बारामती, पुरंदर, दौंड, जुन्नर, शिरूर या सहा तालुक्यांमध्ये सध्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्या तालुक्यांमधील 25 गावे आणि 271 वाड्या वस्त्यांमधील 72 हजार 959 नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या सहा तालुक्यांमध्ये आजमितीला 37 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दुष्काळाची तीव्रता वाढल्याने जानेवारीनंतर आणखी टँकर वाढण्याची भीती अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

दुष्काळाची तीव्रता वाढणार

जिल्ह्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे जवळपास भरली होती. मात्र, शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने आजही अनेक तालुक्यातील नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दुष्काळाची दाहकता वाढली आहे. जिल्ह्यात सुरुवातीला 9 टँकर सुरू करण्यात आले होते. आता ही संख्या वाढून 37 पर्यंत पोहोचली आहे. यापुढे दुष्काळाची तीव्रता वाढल्यास टँकरची संख्या वाढू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली.

नद्या, तलाव पडले कोरडे

जिल्ह्यात धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे जवळपास भरली. मात्र, शेतीसाठी आवश्यक असा पाऊस न झाल्याने आजही अनेक तालुक्यांतील नद्या तसेच तलाव कोरडे पडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. राज्यभरात प्रशासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केली आहे. सुरुवातीला 9 टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, यात वाढ झाली असून ही संख्या 38 वर पोहोचली आहे.