जिवंत काकाला मयत दाखवणे पडले महागात

0

महाड : जिवंत असलेल्या काकाला मरण पावलेला दाखवून त्यांची जमिन हडप करण्याचा प्रयत्न करणार्‍या पुतण्यावर व त्याच्या चार साथिदारांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाड तालुक्यातील दासगाव गावात हा प्रकार घडला आहे.

दासगाव येथे दयाराम उर्फ दत्तात्रेय विष्णु गुडेकर यांची जमिन असुन ते जिवंत असतानाही त्यांचा पुतण्या संतोष गुडेकर याने ते मरण पावले असल्याचे भासवून आपणच त्यांचे कायदेशीर वारस असल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले. व या कागदपत्रांच्या आधारे त्याने दयाराम उर्फ दत्तात्रेय विष्णु गुडेकर यांच्या मालकीची मिळकत स्वतःच्या आणि स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतली. महाड येथील भूमीअभिलेख कार्यालयाने वारस नोंद करताना केलेल्या पंचनाम्यावर रामा विठोबा निर्मल, अशोक शांताराम वनगुले, संदीप शांताराम चाळके आणि भागोजी गं. उकिर्डे यांनी पंच म्हणून स्वाक्षर्या केल्या आहेत.हा सर्व प्रकार दत्तात्रेय गुडेकर यांची मुलगी शीतल दत्तात्रेय गुडेकर हिच्या लक्षात आल्यानंतर, तिने या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संतोष गुडेकर याच्यासह रामा विठोबा निर्मल, अशोक शांताराम वनगुले, संदीप शांताराम चाळके आणि भागोजी गं. उकिर्डे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे हे करीत आहेत.