जिवंत काडतूस व कट्ट्यासह संशयीत धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Panic at gunpoint in village: Suspect in Shirpur crime branch’s net धुळे : गावठी कट्ट्याच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या शिरपूरातील संशयीताला धुळे गुन्हे शाखेने सोनगीर गावाजवळील वालखेडा फाट्याजवळून अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार, 25 नोव्हेंबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी सोनगीर पोलिसात संशयीत हरीओम संजय सिंह (रा.करवंद नाका, शरदचंद्र नगर, शिरपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून करवाई
संशयीत हरीओम संजय सिंह (रा.करवंद नाका, शरदचंद्र नगर, शिरपुर) याच्याकडे गावठी कट्टा असून त्या आधारे तो दहशत निर्माण करीत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सोनगीर गावाजवळील वालखेडा फाट्यावर शुक्रवारी रात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संशयीताकडून 25 हजारांचा गावठी कट्टा व एक हजार रुपये किंमतीचे एक काडतूस जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, एएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, मयूर पाटील, कमलेश सूर्यवंशी, तुषार पारधी, राहुल गिरी, चालक कैलास महाजन यांनी केली.

वर्षभरात 39 कट्टे जप्त
धुळे गुन्हे शाखेने वर्षभरात पिस्टल व काडतुसबाबत एकूण 27 गुन्हे दाखल केले असून त्यात 39 गावठी कट्टे व 62 काडतूस जप्त केले आहेत.