चोपडा । शलीस दलातील सर्वोच्च असे राष्ट्रपती पोलीस पदक आणि मानाचे इनसिग्निया पदक मिळाले. परंतु समाजातर्फे झालेला हा सत्कार मोलाचा वाटतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वप्न डोळ्यात नव्हे तर हृदयात साठवून ठेवावे कारण हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते, असा सल्ला जळगाव येथील सहा पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील (बारी) यांनी उपस्थितांना दिला. ते येथील बारीवाड्यात श्री समस्त सूर्यवंशीय बारी समाज पंच मंडळ, नागवेल मित्र मंडळ व बारी समाज महिला मंडळाच्यावतीने आयोजित गुणवंत सत्कार सोहळ्यात बोलत होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक जीवन चौधरी हे होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव येथील डॉ.राजेंद्र पायघन (बारी) यांच्यासह बारी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष विश्वंभर बारी, उपाध्यक्ष गिरिराज बारी, सचिव योगानंद बारी, नागवेल मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल बारी, बारी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी बारी, अॅड संजय बारी, शंकर धोंडू मिस्तरी हे होते. याप्रसंगी सीबीएसई परीक्षेत भारतातून दूसरा तर महाराष्टातून पाहिला क्रमांक मिळवणार्या आयुषी पायघन तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकातील सपोनि अरुण पाटील (बारी) यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ’राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तम गुण संपादन करणार्या समाजातील चोपडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सुंदर हस्ताक्षर, रंगभरण, सामान्य ज्ञान, वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वीतांना बक्षिसे देवून गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेवक जीवन चौधरी आणि सहा पोलीस उपनिरीक्षक अरुण पाटील यांनीही समयोचित मनोगते व्यक्त केली. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते भारत माता व श्री रूपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वसंत नागपुरे यांनी ईशस्तवन सादर केले. सूत्रसंचालन संजय बारी यांनी तर आभार प्रदर्शन योगानंद बारी यांनी केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. यशस्वितेसाठी अनेकांनी प्रयत्न केले.