जिवाजी महाले स्मारकासाठी पाठपुरावा करा

0

जेजुरी । छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत अंगरक्षक व नाभिक समाजाचे शूरवीर जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडावर उभारण्यास सन 2004 मध्ये महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली. मात्र अद्यापही त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे हे स्मारक लवकरात लवकर उभे होण्यासाठी राज्यातील नाभिक बांधवांनी एकजुटीने सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन जिवाजी माहले स्मारक समितीचे सदस्य सुधीर गवळी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या पुरंदर व जेजुरी शाखेच्या वतीने जेजुरीत पुरंदर तालुक्यातील नाकि समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास पुरंदर शाखेचे अध्यक्ष राहुल मगर, पदाधिकारी भारत मोरे, भगवान राऊत, अशोक गायकवाड, सुशील राऊत, मल्हार राऊत, बाळासाहेब साळुंखे, नितीन राऊत, माजी नगरसेवक दिलीप गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ मोरे, सुशील गायकवाड, शांताराम घोडके, संतोष पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी समाजाचे नगरसेवक, सरपंच, ग्रामसपंचायत सदस्य, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील नाभिक समाज जनगणना उपक्रमाचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. नितीन राऊत यांनी प्रास्ताविक केले, तर भगवान राऊत यांनी आभार मानले.