जि.प अधिकार्‍यांवर एसीबीची करडी नजर

0

धुळे । पंचायत राज समिती दौर्‍या दरम्यान आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान एसीबीकडून अधिकार्‍यांची जबाब नोंदणी घेण्यात येत असून एसीबीचे वरिष्ठ अधिकार्‍यांसह मंत्रालयातील अधिकारी या कारवाईवर करडी नजर ठेवून असल्याची माहिती विश्‍वसनिय सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागात लाचप्रकरणाच्या चौकशीला वेग आला असून नाशिक येथील पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले हे धुळे कार्यालयात अधिकार्‍यांवर होणार्‍या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी तळ ठोकून आहेत.

पोलीस अधीक्षक उगले तळ ठोकून
तीन दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील सुमारे 10 ते 12 संपर्क अधिकार्‍यांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. पंचायत राज समितीचे सदस्य आ.हेमंत पाटील यांना दीड लाखांची लाच देण्याचा प्रयत्न करणार्‍या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना अटक झाली असनू ते पोलीस कोठडीत आहेत. त्याच्या चौकशीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील अधिकार्‍यांचे जाबजबाब नोंदणीचे काम वेगाने सुरु आहे. या कार्यवाहीवर मंत्रालय स्तरावरील काही अधिकारी लक्ष ठेवून असल्याचे सुत्राकडून कळते.

शाळेच्या पोषण आहाराचा पंचनामा
या प्रकरणाची कार्यवाही कुठपर्यंत पोहोचली याची माहिती घेण्यासाठी नाशिकहून पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले हे धुळे कार्यालयात बसून आहेत. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कागदोपत्री तसेच अन्य महत्वाची माहिती जाणून घेतल्याचे कळते. तर कापडणे येथील शाळेच्या पोषण आहाराचा पंचनामाही झाल्याचे समजते. अधीक्षक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, निरीक्षक पवन देसले, निरीक्षक महेश भोरटेकर, हवालदार संतोष हिरे, किरण साळी, कैलास शिरसाठ, देवेंद्र वेंदे, जितेंद्र परदेशी,संदीप सरग, सतिष जावरे, प्रशांत चौधरी, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकुर,कृष्णकांत वाडीले, प्रकाश सोनार, संदीप कदम हे करीत आहेत.