सत्ता भाजपकडे कायम राहण्याची शक्यता; कॉंग्रेस सदस्यांची भाजपसोबत जाण्यास पसंती
जळगाव: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रिया आज शुक्रवारी ३ रोजी पार पडणार आहे. त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजेपासून निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दुपारी ३ नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर काही वेळातच निवड जाहीर केली जाणार आहे. आवाजी मदतानाने इन कॅमेरा ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवड प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे कामकाज पाहणार आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण केली असून सर्व सदस्यांना पत्र देखील पाठविण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे एक आणि शिवसेनेचे एक सदस्य अपात्र झाल्याने ६५ सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदविणार आहे. तत्पूर्वी राजकीय घडामोडींना वेग आले होते. भाजपची गुरुवारी संध्याकाळी उमेदवार जाहीर करण्याबाबत कोअर कमिटीची बैठक घेतली. यात माजीमंत्री एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पल्लवी सावकारेंचे नाव आघाडीवर
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रावेर लोकसभा मतदारसंघातून तर उपाध्यक्ष जळगाव लोकसभा मतदारसंघातून देण्यावर भाजपची सहमती झाली आहे. त्यानुसार अध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार पल्लवी सावकारे, रावेरच्या रंजना पाटील आणि नंदा पाटील यांचे नाव समोर येत आहे. उपाध्यक्ष पदासाठी मधुकर काटे यांचे एकमेव नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी जातीय समीकरणाचा देखील अवलंब केला जात असल्याची चर्चा आहे. उपाध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेले मधुकर काटे हे मराठा समाजाचे आहे, त्यांना उपाध्यक्ष पद मिळाल्यास पल्लवी सावकारे यांना अध्यक्षपद निश्चित मानले जात आहे.
कॉंग्रेस व्हीप मोडणार
जिल्हा परिषदेत सध्या कॉंग्रेसच्या पाठींब्यावर भाजपची सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असल्याने स्थानिक राजकारणातही काही ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रयोग केला जातो आहे. मात्र जळगाव जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण २०१७ प्रमाणे यावेळीही भाजपसोबतच जाण्याची तयारी कॉंग्रेसच्या चारही सदस्यांनी दर्शविली आहे. पक्षाने जरी कॉंग्रेस सदस्यांना व्हीप बजावला असला तरी सदस्य मात्र व्हीपच्या विरोधात जाऊन भाजपला पाठींबा देणार आहेत, काही सदस्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बहुमत भाजपकडे: ना. गुलाबराव पाटील
शिवसेना, राष्ट्रवादीने महाविकासचा प्रयोग यशस्वी करण्याबाबत तयारी सुरु केली होती. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉ.संजय सावंत, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांची राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन महाविकास आघाडीबाबत चर्चा केली होती. चर्चेत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना अध्यक्षपद देण्याबाबत सहमती देखील झाली. मात्र कॉंग्रेसने भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे. जि.प.बाबत विचारणा केली असता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडे बहुमत असल्याने त्यांचाच अध्यक्ष होईल मात्र आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
मागील अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे काही सदस्य सभेला गैरहजर राहिले होते. त्यांचा अपघात झाल्याची बतावणी करण्यात आली होती. यंदा महाविकास आघाडीच्यादृष्टीने राष्ट्रवादीचे सर्व सदस्य एकत्र राहतील असे बोलले जात होते. मात्र निवडणुकीच्या एक दिवस अगोदर राष्ट्रवादीचे तीन सदस्य फुटल्याची चर्चा होती. तीनही सदस्य भाजपला मदत करणार असल्याची चर्चा होती.
अध्यक्षपदाची नावे प्रदेशाध्यक्षांकडे
भाजपच्या कोअर कमेटीची बैठक आटोपल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आ. गिरीश महाजन यांची संयुक्त पत्रकार परीषद झाली. या पत्रकार परीषदेत माहिती देतांना आ. गिरीश महाजन यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. वरीष्ठ पातळीवरून नाव रात्रीतुन जाहीर होण्याची शक्यता असल्याचे आ. महाजन यांनी सांगितले.
अध्यक्षपदाची नावे प्रदेशाध्यक्षांकडे
भाजपच्या कोअर कमेटीची बैठक आटोपल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आ. गिरीश महाजन यांची संयुक्त पत्रकार परीषद झाली. या पत्रकार परीषदेत माहिती देतांना आ. गिरीश महाजन यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार आहे. वरीष्ठ पातळीवरून नाव रात्रीतुन जाहीर होण्याची शक्यता असल्याचे आ. महाजन यांनी सांगितले.