जि.प.अध्यक्षा ‘स्थायीत’संतापल्या

0

नंदुरबार। जि ल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. त्यातच स्थायी सभेला अत्यंत महत्व असते. जनतेच्या विकासाचा बाबतीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जात असतात. परंतु, अधिकारीच सभेला विनापरवानगी गैरहजर राहत असतील तर सभा घेऊन काय उपयोग असा संतप्त सवाल उपस्थित करून संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा आदेश अध्यक्षा रजनी नाईक यांनी दिला. जिल्हा परिषदेची स्थायी सभा शुक्रवार 11 रोजी याहामोगी सभागृहात अध्यक्षा रजनी नाईक यांनी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, महिला व बालकल्याण सभापती लताबाई पाडवी,समाज कल्याण सभापती आत्माराम बागले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी उपस्थित होते.

रिक्त पदांची माहिती शासनास सादर
जिल्ह्यातील रिक्त शिक्षक पदांच्या बाबतीत सदस्य रतन पाडवी यांनी आयत्या वेळी प्रश्न उपस्थित केला असता याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. व्हीसीद्वारा प्रधान सचिवांना अवगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सभेत विविध विषयांच्या आढावा खाते प्रमुखांनी सादर केला. स्थायी सभेत आर्थिक विषयांवर चर्चा करण्यात येते. तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यात येत असते, परंतु अधिकारीच गायब असल्याने ही माहिती कोणा कडून घ्यावी असा प्रश्‍न सदस्यांना पडला होता. अधिकार्‍यांनी अध्यक्षांची परवानगी न घेतल्याने अध्यक्षांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

अध्यक्षांनी गैरहजर अधिकार्‍यांची घेतली माहिती
सभेच्या सुरुवातीलाच अध्यक्षा रजनी नाईक यांनी सभेला कोण कोण अधिकारी गैरहजर आहेत अशी विचारणा केली. यावेळी अनेक अधिकारी अनुपस्थित असल्याचे समोर आले. यावेळी विभागाच्या प्रतिनिधींनी अधिकारी शासकीय कामकाजासाठी बाहेर गावी गेल्याचे सांगून अधिकार्‍यांची बाजू सांभळण्याचे काम केले. सभेत जनतेच्या विकासाचा प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले जात असतात. पदाधिकारी किंवा सदस्यांनी समस्या उपस्थित केल्यास त्यांना योग्य माहिती कोण देईल अशी विचारणा करण्यात आली. अधिकार्‍यांना स्थायी सभेचा आयोजनाची माहिती असूनही कोणाची परवानगीने ते गेले असा संतप्त सवाल उपस्थित करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश अध्यक्षा नाईक यांनी दिला.

शिक्षक एप्रिलपासून गैरहजर
सभेत दांडी बहाद्दर मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मुद्यावरही गंभीर चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील शाळा भेटी प्रसंगी 17 ठिकाणी शिक्षक तर मांड्यामुड्या गावी मुख्याध्यापक एप्रिल महिन्यापासून गैरहजर असल्याची बाब निदर्शनास आल्याचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी सांगितले. अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त करण्यात आली. त्यावर प्राथमिक शिक्षा विभागाचे उपशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांनी संबंधितांची चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती सभागृहाला दिली.