जि.प.अध्यक्ष बदलाबाबत हालचाली

0

जळगाव । जिल्हा परिषदेत कामे होत नसल्यामुळे सत्ताधारी गटाच्या नाराज सदस्यांकडून अध्यक्षांना पायउतार करण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. यासंदर्भात पडद्यामागील हालचालींना वेग आला असून शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी भाजपाच्या नाराज गटाशी संपर्क साधत जि.प.त सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. याप्रकारामुळे पदाधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

पक्षश्रेष्ठींकडे काहींची कानभरणी
भाजपात खडसे आणि महाजन असे दोन गट असल्यामुळे या गटातटाच्या राजकारणात अंतर्गत धुसफूस वाढत आहे. अध्यक्षांकडून विकास कामांसंदर्भात ठोस भुमिका घेतली जात नसल्यामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यात सदस्यांना आपापल्या गटात कामे करता आली नाही. त्यामुळे जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. निधीचे नियोजन करण्यासाठीच तब्बल दहा महिने जावे लागले. सदस्यांचे कामे मार्गी लावण्यासंदर्भात अध्यक्षांची कामगिरी समाधानकारक नसल्याची कुरघोडी करीत नाराज सदस्यांनी अध्यक्षांबाबत पक्षश्रेष्ठींकडे वारंवार कानभरणी करीत अध्यक्षांना पायउतार होण्याबाबत जोर लावला आहे. यासाठी आता विरोधी शिवसेना व राष्ट्रवादीचेही सदस्य एकवटले असून त्यांनी भाजपाच्या नाराज गटाशी संपर्क साधत सत्ता स्थापनेसाठी आपला पाठिंबा दर्शविला आहे. प्रतिक्षा आहे केवळ पक्षाच्या नेत्यांकडून यास हिरवा कंदील मिळण्याची. जि.पतील या हालचालींबाबत पदाधिकार्‍यांना विचारणा केली असता. आपणास याबद्दल काही एक माहिती नाही. असे सांगत इतर बाबींवर चुप्पी साधली.