जि.प.चा गंभीर प्रकार उघड; फेकरी ग्रा.पं.ला दिला चेक
जळगाव: जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून संबोधले जाते. ग्रामीण जनतेच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या बहुतांश योजना ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच राबविल्या जातात. निधी वितरीत करण्याचे मुख्य काम जिल्हा परिषदेमार्फत होत असते. मात्र निधी वाटपात गोंधळ होत असल्याची तक्रार ऐकायला येते, मात्र जिल्हा परिषदेने चक्क ग्रामपंचायतीला विनास्वाक्षरीचा धनादेश दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
भुसावळ तालुक्यातील फेकरी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेतर्फे विनास्वाक्षरीचा धनादेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिली. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांनी यांनी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांच्या निदर्शनास आणून दिले. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ग्रामनिधी म्हणून ३९४१० चा धनादेश फेकरी ग्रामपंचायतीला दिला. ६ नोव्हेंबरला हा धनादेश देण्यात आला आहे. मात्र त्यावर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नसल्याने तो बँकेत वटला नसता, मात्र बँकेत जमा करण्यापूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा हा धनादेश आहे.