जि. प. चे विद्यार्थी गवणेशापसून वंचीत

0

फुरसुंगी । नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना होऊन गेला तरी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश अद्याप मिळाला नसल्याचे समोर आले आहे. शासनस्तरावर गणवेशाची तरतूद झाली असतानाही विद्यार्थ्यांची बॅँक खाती उघडण्यास होणार्‍या विलंबामुळे यावर्षी अद्यापपर्यंत अनेक शाळांतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिलेले दिसत आहेत. शासनामार्फत दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीतील, द्रारिदय रेषेखालील मुलांना दोन गणवेशासाठी शाळास्तरावर (400 रुपये) निधी उपलब्ध करून दिला जातो. यातून दोन गणवेश शाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.

बँक खाते उघडण्याचे आदेश
2017-18 या शैक्षणिक वर्षापासून संबंधित लाभार्थी विद्यार्थ्यांना थेट गणवेश न देता या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर या दोन गणवेशाचे पैसे (400 रुपये) वर्ग करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला. त्यामुळे संबंधित लाभार्थी विद्यार्थी व त्याची आई या दोघांचे नाव संयुक्त बँक खाते काढण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

मोलमजुरी करणार्‍यांसमोर अडचणी
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची खाती वगळता इतर कोणत्याही विद्यार्थ्यांची बँक खाती नसल्याने मागील दोन-चार महिन्यांपासून राहिलेल्या सर्व विद्यार्थी, नवीन प्रवेश घेणांरे विद्यार्थी यांची बँक खाती उघडण्यासाठी मुख्याध्यापक, वर्गशिक्षकांना पालकांचा पाठपुरावा करावा लागत आहे. काही सुशिक्षित पालकांनी आपल्या पाल्यांची बँक खाती उघडली आहेत. मात्र वीटभट्टी, बांधकाम साईट, मोलमजूरीसाठी आलेल्या परप्रांतीय पालकांना मात्र मुलांची बँक खाती उघडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बँकेत मारावे लागतात हेलपाटे
रहिवाशी पुरावा नसणे, बँकामार्फत पंतप्रधान झिरो बॅलन्स योजनेअंतर्गत खाती न उघडता 500/1000 रुपये घेऊन खाती उघडणे, आधारकार्ड नसणे, राष्ट्रीयीकृत बँकेतच खाते उघडण्याची सक्ती, बँकाचा निरुत्साह आदी विविध कारणांमुळे या अशिक्षित, परप्रांतीय पालकांना कामावरून सुट्टी घेऊन बँकाच्या चकरा माराव्या लागत आहेत. पुणे शहरालगतच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारच्या परप्रांतीय विद्यार्थ्यांची मोठी संख्या असल्याने अद्याप एकूण लाभार्थी संख्येपैकी 50 टक्के विद्यार्थ्यांचीही खाती निघाली नसल्याचे समोर येत आहे.

पावती दाखवा पैसे मिळवा
बँकखाती उघडल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या पालकाने प्रथम स्वत: 400 रुपये खर्च करून दोन शालेय गणवेश खरेदी करावयाचे असून त्यानंतर या खरेदीची पावती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना दाखविल्यानंतर त्या पालकाच्या खात्यावर या दोन गणवेशाचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे हा प्रकार निव्वळ मनस्तापाचा असून यापेक्षा पुर्वीची गणवेशाची पद्धत चांगली होती, अशी प्रतिक्रिया या पालकांकडून येत आहे.

विद्यार्थी गणवेशात दिसणार का?
हवेलीत अद्यापपर्यंत फक्त एकाच गणवेशाचे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनापर्यंत तरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी नवीन गणवेशात दिसणार आहेत का असा प्रश्‍न येथील सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.