रिक्त पदे तत्काळ भरावित सभापतींची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
पुणे । जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 96 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 539 उपकेंद्र आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सेवक महिला व पुरुष, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मिळून 585 रिक्त पदे आहेत. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी जिल्ह्याधिकारी सौरव राव यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरल्यास जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यास मदत होईल. त्यासाठी जिल्हाधिकार्यांनी पुढाकार घेऊन रिक्त पदे भरावीत अशी मागणी माने यांनी केली रिक्त पदे भरण्याचे निवदेन सादर करताना खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
जिल्ह्यात रिक्त पदामध्ये आरोग्य सेवक महिला 350, आरोग्य पुरुष कर्मचारी 221, औषध निर्माण अधिकारी 12, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 मिळून 585 जागा भरावयाच्या आहेत. रिक्त पदाची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने मान्यता देण्यात येणार आहे. शासनाकडून अद्यापही वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी आरक्षण निश्चित केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी निर्णय घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.
सेवा मिळत नसल्याची तक्रार
मागील अनेक दिवसांपासून तालुकास्तरावर आणि उपकेंद्रावर आरोग्य सेवक पुरुष आणि महिला तसेच औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पदे रिक्त असल्यामुळे अनेकवेळा रुग्णांना वेळेत सेवा मिळली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यावतीने काढलेल्या आदेशामध्ये जिल्हाधिकार्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुुळे जिल्ह्यातील रिक्त 585 पदे भरण्याची मागणी माने यांनी जिल्हाधिकार्यांना केली आहे.
रिक्त वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरण्याची मागणी
जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील 96 प्राथमिक आरोग्य केंद्रात सद्यस्थितीत वैद्यकीय रिक्त 45 पदे, जिल्हा शल्य चिकित्सक 22 पदे मिळून 67 पदांच्या आरक्षण निश्चितीसाठी तातडीने रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली आहे.