जळगाव : विद्यमान जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा वादळी चर्चेसह जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी जि.प. सदस्यांनी अपुर्या विकास कामांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जि.प. अधिकारी यांच्यासह पदाधिकारी यांनी चुप्पी साधल्याने सदस्यांचे प्रश्न अनुत्तरीतच
राहिले. सभेत आरोग्य विभागा संदर्भातील प्रश्न अधिक प्रमाणात मांडले गेले. दरम्यान, जामनेर पंचायत समितीच्या बीओटी तत्वाच्या निधीवरून बराच वेळ खडाजंगी उडाली.
रिक्त पदावरून गोंधळ
प्राथमिक आरोग्य केंद्रावर अपुरे वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकार्यांची रिक्त पदे, नवीन आरोग्य केंद्राच्या उभारणीत होत असलेले विलंब,अपुर्या सेवा सुविधा, आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारती, स्वच्छता आदी प्रश्नाचा जि.प.सदस्यांनी भडीमार केला. तसेच यावेळी जि.प.सदस्य उद्धव पाटील यांनी जिल्ह्यात 45 टक्के रुग्ण हे डायबीटीज ग्रस्त असल्याने आणि डायबीटीज औषधी उपलब्ध करण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नसल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान अध्यक्षांच्या परवानगीने सभेत आयत्या वेळी नियमबाह्य विषय मांडण्यात आल्याने सदस्यांनी अध्यक्षांशी चांगलाच वाद घातला.
उद्धव पाटील यांच्या सदस्यत्वावरुन वाद
बोदवड येथील जि.प.सदस्य उद्धव पाटील यांनी जि.प.सदस्य पदावर कार्यरत असतांना पदाचा राजीनामा देत बोदवड नगरपंचायतची निवडणूक लढविली. राजीनामा दिलेला असतांनाही ते सभेत कसे काय उपस्थित आहेत? असा प्रश्न जि.प.सदस्य अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी यांनी उपस्थित केला त्यानंतर त्यांच्या सदस्यत्वाबाबत खुलासा करुन नियमावली दाखवा अशी अट घातली गेली.
आयत्या वेळीच्या विषयांचा वाद
जामनेर पंचायत समितीची जागा ही जिपच्या मालकीची असतांना जि.प.ने 9 लाख रुपये किंमतीने बीओटी तत्त्वावर देऊन मिळालेल्या रक्कमेचा जामनेर पंचायत समितीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी खर्च करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. दुरुस्ती देखभालीचा नियम सर्व विभागांसाठी समान असून शासनाने देख भालीचा खर्च बांधकाम विभागामार्फत देण्याची व्यवस्था केल्यावर बीओटी तत्त्वावर देण्याचा प्रश्नच येत नसल्याने हा विषय नियमबाह्य ठरवत नामंजुर करण्यात आला. अशा प्रकारचा चुकीचा पायंडा पाडू नका असे अध्यक्षांना सांगत सदस्यांनी बराच वेळ वाद घातला.