जि.प., पं.स. उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद

0

जळगाव (जनशक्ति चमू) । जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी गुरूवारी सुमारे 62.79 टक्के सरासरी मतदान झाले. यात बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले तरी काही ठिकाणी याला गालबोट लागले. अमळनेतर तालुक्यातील झाडी येथील ग्रामसेवक तालुक्यातील लक्ष्मण बाविस्कर यांच्या डोक्याची नस तुटल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली असून यासाठी अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्या आप्तांनी केला. पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. मान्यवरांनी समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी मतदान केले. तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद व आव्हाणे येथे मतदार याद्यांमध्ये नविन व जुन्या याद्यांमुळे घोळ झाल्याने काही काळ मतदान बंद झाले होते. मात्र प्रशासनाने याची दखल घेत याचा लागलीच निपटारा केल्याने दुपारनंतर मतदान सुरळीत सुरू झाले होतेे. तर भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा येथे भाजप उमेदवाराशी विरोधकांनी हुज्जत घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा अपवाद वगळता जिल्ह्यात इतरत्र शांततेत मतदान पार पाडले. काही ठिकाणी उशीरापर्यंत रांगा लागल्या होत्या. मतदानानंतर आता उत्सुकता आता निकालाकडे लागली आहे.

कामाच्या तणावाने ग्रामसेवकाचा मृत्यू

अमळनेर । तालुक्यातील झाडी येथील ग्रामसेवक लक्ष्मण बाविस्कर हे आचार संहिताबाबत एकावर गुन्हा दाखल करुन घरी आल्यावर त्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याने अचानक ओट्यावरुन पडले. पडल्यानंतर त्यांच्या डोक्याची नस तुटल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची घटना बुधवार 15 फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेमुळे अधिकार्‍यांच्या दबावामुळे मृत्यु झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयानी व ग्रामसेवक संघटनेने केला व मयताचा मृतदेह थेट प्रांत कार्यालयावर
आणल्यानंतर प्रांत कार्यालयातील अधिकार्‍यांची एकच तारंबळ उडाली होती.

मृतदेह आणला प्रांत कार्यालयात

झाडी तालुका अमळनेर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण पुंडलिक बाविस्कर हे जि.प. व पं.स.निवडणुकीच्या काळात गावात निंबाच्या झाडावर राजकीय पक्षाचा ध्वज आढळून आल्याने आचारसहिता भंगाबाबत मारवड पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी 15 रोजी गेले होते. त्या ठिकाणहुन घरी आल्यावर कामाच्या तणावात त्यांचे ब्लड प्रेशर वाढल्याने तोल जावुन ते ओट्यावर पडले. त्यात त्यांची डोक्याची नस तुटल्यानंतर त्यांना उपचारासाठी धुळे येथे नेत जात असतांना रस्त्यात लोंढवे गावाजवळ त्यांचा मृत्यु झाला. गुरूवारी 16 रोजी सकाळी परिवारातील लोकांनी मृतहेह प्रांत कार्यालयासमोर आणून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दबावामुळेच मृत झाल्याचे आरोप करुन आक्रोश केला. मात्र, याबाबत प्रशासनाने व अधिकारी वर्गाने दखल घेतली नाही असा आरोप मयत ग्रामसेवकांच्या कुटुंबियांनी केला आहे.

तामसवाडी येथे बहिष्काराचा पवित्रा

पारोळा । तालुक्यातील तामसवाडी येथील परिसरातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आज होणार्‍या निवडणुकीवर मतदानासाठी बहिष्कार टाकला होता. 5 मे 2016 रोजी तामसवाडी परिसरात झालेल्या आकस्मात असलेल्या गारपीट होवून परिसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी अनेकदा महसूल विभाग, जिल्हाधिकारी, कृषीमंत्री यांना वेळोवेळी स्मरणपत्र देवूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यांचा निषेध म्हणून परिसरातील शेतकर्‍यांनी 16 फेबु्रवारी 2017 रोजी जि.प. व पं.स. निवडणुकीवर होणार्‍या मतदानावर बहिष्कार केला होता. हा बहिष्कार मागे घेण्यात यावा, यासाठी प्रांताधिकारी राजेंद्र काचरे यांनी बहिष्काराच्या ठिकाणी जावून नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या ऐकल्या व त्यांना शासनाकडून लवकरात लवकर झालेल्या नुकसानाची भरपाई मिळेल, असे प्रांताधिकारींनी शेतकर्‍यांना सांगितले. तसेच सदर ठिकाणी पारोळा-एरंडोल मतदार संघाचे आमदार डॉ.सतिश पाटील यांनीही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या समस्या ऐकल्या व त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले. यामुळे दुपारी 1 वाजेच्या सुमारास जि.पं. व पं.स. निवडणुकीवर होणार्‍या मतदानावर बहिष्कार घेण्यात आला.

कुर्‍हे पानाचे येथे भाजपा उमेदवाराकडून पैसे वाटल्याची अफवा

भुसावळ । तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणांच्या निवडणूकीसाठी गुरुवार 16 रोजी मतदान केंद्रांवर किरकोळ वाद वगळता मतप्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वत्र मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. मात्र चार वाजेपासून नागरिक घराबाहेर पडल्यामुळे केंद्रांवर रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 42.26 टक्के मतदान झाले होते. तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथे भाजपाच्या उमेदवार पल्लवी सावकारे या मतदान केंद्रावर भेट देऊन परतत असतांना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याची शंका आल्याने त्यांनी वाहनाजवळ येऊन झडती घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी दोन्ही गट समोरा- समोर येऊन शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच कुर्‍हे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी निलोत्पल यांनी भेट देऊन पाहणी केली. व अतिरीक्त बंदोबस्त मागवून कर्मचार्‍यांना सर्तकतेच्या सुचना केल्या.

दोन केंद्रावर मतदान थोडा वेळ थांबवले

जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 67 गट व पंचायत समितीचे 134 गणांसाठी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. गट व गणामधील उमेदवारांनी सकाळीच मतदान करीत आपले कर्तव्य बजावले. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे सकाळी 8 वाजेपासून मतदान केंद्रांवर गर्दी सुरु झाली. शेतकरी व शेतमजुरांनी सकाळीच मतदान आटोपले. मतदानासाठी आलेल्या नागरिकांना आपले नावे मतदान याद्यांमध्ये मिळत नसल्याने मतदान न करता परत यावे लागले. यामुळे उमेदवार व मतदारांनी जळगाव तालुक्यातील नशिराबाद व आव्हाणे येथील दोन केंद्र बंद पाडले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी नशिराबाद येथील केंद्रावर भेट दिली आहे.यानंतर त्याठिकाणी बुथ असलेल्या याद्या ह्या जुन्या होत्या.यावेळी निवडणुक आयोगाकडून आलेल्या याद्या ह्या मतदान केंद्राप्रमाणे असल्याने त्यांना नावे शोधण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच उमेदवारांजवळ या नव्या याद्या नसल्याने हा घोळ झाला होता. त्यांना तात्काळ याद्या पुरविण्यात आल्या. याठिकाणी बीएलओ यांनी समजवून सांगितले. तर आव्हाणे येथे मोबाईल अ‍ॅपव्दारे मतदारांची नावे शोधण्यात येत होती. त्यात अनुक्रमांक व नाव योग्य येत नसल्याने घोळ असल्याने तेथेही तहसिलदार निकम यांनी याची दखल घेत ग्रामस्थांना व उमेदवारांना याद्याची माहिती दिली. उमेदवारांकडे मतदारांची जिल्हा परिषद गट व गणनिहाय यादी होती. त्यानुसार उमेदवारांनी मतदारांना या यादीतील अनुक्रमांक व मतदान केंद्रक्रमांकाची माहिती पुरवली आहे. मात्र रविवारी निवडणूक आयोगाकडून केंद्रनिहाय याद्या प्राप्त झाल्या आहेत. तहसीलदारांनी उमेदवारांना सुधारित याद्या घेऊन जाण्याबाबत आवाहन केले होते. काही गावातील उमेदवारांनी या न नेल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर तहसीलदार अमोल निकम यांनी नशिराबाद, आव्हाणे व शिरसोली येथे तलाठी नियुक्त करत मतदारांना अनुक्रमांक व मतदान केंद्र क्रमांक काढून देण्याची सुचना केली. यानंतर तहसीलदारांनी या तिन्ही गावांना भेट देवून पाहणी करीत कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचित ठेवू नये अशी सुचना केंद्रप्रमुखांना केली आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेनंतर या तिन्ही केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु झाल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी बोलतांना सांगितले.