नवनियुक्त सभापतींनी स्वीकारली सूत्रे; स्वागतासाठी गर्दी
जळगावः सोमवारी 6 रोजी जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली. चारही सभापतिपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. सभापती निवडीत बंडखोरी आणि नाराजी नाट्याने भाजप नेत्यांच्या नेतृत्वाची कसोटी पहायला मिळाली. शेवटी अनेक नाट्यमयघडामोडीनंतर चारही सभापतिपदी भाजपचेच उमेदवार विजयी झाले. समाजकल्याण सभापतिपदी जयपाल बोदडे, महिला आणि बालकल्याण सभापतिपदी ज्योती पाटील, विषय समिती क्रमांक एकवर रविंद्र पाटील आणि विषय समिती क्रमांक दोनवर उज्ज्वला माळके यांची निवड झाली. निवडणूकीनंतर आता विषय समिती एक आणि दोनच्या वाट्याला कोणत्या विभागाची जबाबदारी दिली जाणार? याबाबत उत्स्कुता आहे. दरम्यान यावेळी विषय समित्यांच्या रचनेत देखील बदल करण्यात येणार आहे.
2017 ला चुकीची रचना
2017 ला जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतर स्थापन झालेल्या विषय समितीत नियमाचे उल्लंघन करुन अर्थ आणि बांधकाम विभाग उपाध्यक्षांकडून काढून तो अनुक्रमे शिक्षण आणि महिला बालकल्याण सभापतींकडे देण्यात आला होतो. तसेच शिक्षण आणि आरोग्य समितीही दोन वेगवेगळ्या सभापतींना विभागून देण्यात आल्या होत्या. नियमानुसार अर्थ आणि बांधकाम समितीचा कारभार हा उपाध्यक्षांकडे असतो. तर शिक्षण आणि आरोग्य समितीचा कारभार एकत्रित असतो. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून अर्थ, बांधकाम, शिक्षण आणि आरोग्य समिती वेगळ्या करण्यात आल्या होत्या. वास्तविक तसे करणे नियमबाह्य होते, मात्र जि.प.सह राज्यात भाजपची सत्ता असल्याने अडीच वर्ष तसाच कारभार चालला.
यावेळी अशी होणार रचना
अर्थ, बांधकाम, शिक्षण आणि आरोग्य समित्या यावेळी एकत्र ठेवण्यात येणार आहे. 2017 च्या आधीप्रमाणे अर्थ आणि बांधकाम विभाग उपाध्यक्षांना दिला जाईल तसेच शिक्षण आणि आरोग्य समितीचा कारभार एकाच सभापतीकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थ आणि बांधकाम खात्याची जबाबदारी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याकडे दिली जाईल. तसेच शिक्षण आणि आरोग्य समिती सभापतिपदी रविंद्र सुर्यभान पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच कृषी आणि पशुसंवर्धन सभापतिपदी उज्ज्वला माळके यांची निवड होण्याची शक्यता आहे.
सभापतिंनी घेतला कॅबीनचा ताबा
विषय समिती क्रमांक एक आणि दोनच्या सभापतींना खातेवाटप करणे बाकी आहे. मात्र तत्पूर्वी काल निवडून आलेल्या सभापतींनी कॅबीनचा ताबा घेतला आहे. कॅबीनचा ताबा घेतल्यानंतर सभापतींच्या स्वगतासाठी मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. अधिकारी तसेच जिल्ह्याभरातून आलेल्या लोकांनी नवनियुक्त सभापतींचे स्वागत केले.
रविंद्र पाटीलांना हवे शिक्षण आणि आरोग्य
पक्षाने उमेदवारी न दिल्याने रविंद्र सुर्यभान पाटील यांनी जाहिर नाराजी व्यक्त करत, जि.प.त राडा केला होतो. त्यानंतर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. बंडखोरीने उमेदवारी मिळविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला आहे. त्यांनी आरोग्य समिती सभापतींकडे असलेल्या कॅबीनचा ताबा घेतला असून आरोगय आणि शिक्षण समितीसाठी ते आग्रही आहेत. पक्षाकडे त्यांनी आरोग्य आणि शिक्षण समिती देण्याची मागणी देखील केली आहे.