नंदुरबार । तालुक्यातील ओसर्ली, आराळेसह इतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थांच्या पालकांना नेहमी अरेरावी करून अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप पंचायत समिती माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्या रीना गिरासे यांनी केला. पंचायत समितीची सर्वसाधारण आढावा बैठक दि.28 रोजी स्व.हेमलताताई वळवी सभागृहात सभापती रंजना नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.यावेळी उपसभापती ज्योती पाटील,ग्राम पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बिर्हाडे,गर्मीन पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता बडगुजर,लघुसिंचन उपअभियंता शिंदे उपस्थित होते.
अजेंड्यावर सहा विषयावर चर्चा झाली.नंदुरबार तालुक्यातील ओसर्ली,आराळेसह इतर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थांच्या पालकांना नेहमी अरेरावी करून अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याची भीती व्यक्त करीत कारवाईची मागणी करण्यात आली. यावर उत्तर देताना गट शिक्षणाधिकारी सी.के.पाटील यांनी शाळांना भेट देणार असल्याचे सांगितले .