जि.प. सभापती माळकेंची निवड अवैध

0

जि.प. सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार: ११ फेब्रुवारीला झाली सुनावणी

जळगाव: जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या सभापतींची 6 जानेवारीला निवड झाली. यात विषय समिती क्रमांक दोन अर्थात कृषी आणि पशुसंवर्धन सभापतीपदी भाजपच्या उज्ज्वला माळके यांची निवड करण्यात आली आहे. मात्र उज्ज्वला माळके यांच्या निवडीवर राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा.डॉ.नीलम पाटील यांनी आक्षेप घेतले असून याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. याबाबत आयुक्तांकडे 11 फेब्रुवारीला सुनावणी झाली असल्याची माहिती प्रा. डॉ.नीलम पाटील यांनी दिली. तक्रारदार डॉ.नीलम पाटील यांच्याकडून वकील अ‍ॅड.चकोर यांनी तक्रार सुनावणी दरम्यान भूमिका मांडली.

सूचक जि.प.सदस्यच नाही

सभापतीपदाच्या निवडीसाठी उज्ज्वला माळके यांनी दाखल केलेल्या अर्जावर प्रा. डॉ.नीलम पाटील यांनी आक्षेप घेतले आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करतांना सूचक आवश्यक असतो. मात्र माळके यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुचकाची स्वाक्षरी नाही. विशेष बाब म्हणजे सूचक हा जिल्हा परिषद सदस्यच नाही अशी धक्कादायक माहिती कागदपत्रातून उघड होत असल्याचे प्रा. डॉ.नीलम पाटील यांनी सांगितले आहे. तसेच नामनिर्देशन पत्रात खाडाखोड करण्यात आलेली आहे. निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर कोणत्याही प्रकारचे अभिसाक्षी प्रमाणपत्र उमेदवार म्हणून उज्ज्वला माळके यांनी सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रा. डॉ.पाटील होत्या उमेदवार

सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून प्रा.डॉ.नीलम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपकडून माळके यांचा अर्ज होता. भाजपला अधिक मते मिळाल्याने माळके यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र माळके यांच्या नामनिर्देशन पत्रात अनेक त्रुट्या असू त्यांची निवड अवैध ठरत असल्याचे आरोप करत प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून नव्याने निवड जाहीर करावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

माझी निवड ही पूर्णपणे कायदेशीररित्या झाली असून आयुक्तांकडे सुनावणी झाली त्यावेळी सर्व बाजू मांडली आहे. निवडप्रक्रियेवर आक्षेप घ्यायचे होते तर निवडणुकीच्या वेळीच घ्यायला हवे होते. निवड प्रक्रिया ही योग्य असून निर्णय आमच्याबाजूने लागेल. सभापती उज्ज्वला माळके