जि.प. सीईओपदी कौस्तुभ दिवेगावकर

0

मुंबई। जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी गडचिरोली येथील उपविभागीय अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचा अतिरिक्त भार असलेले कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधी या पदावर नाशिक येथील महसुल विभागाचे उपायुक्त एस.जी.कोलते यांनी झालेली नियुक्त रद्द करून दिवेगावकर यांचे नाव बुधवारी जाहीर करण्यात आले.

2013 बॅचचे आयएएस
कौस्तुभ दिवेगावकर हे 2013 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते मूळचे लातूरकर असून युपीएससी परिक्षेत देशातून अकरावे तर राज्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. ते डिसेंबर 2015 मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून गडचिरोली येथे रूजू झाले. 7 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला. 1 वर्ष 4 महिने असा गडचिरोली येथील त्यांचा कार्यकाळ राहिला. यानंतर आता त्यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

शेवटच्या क्षणाला बदल
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अकोला जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांमध्येच जी.श्रीकांत यांच्या ऐवजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्त एस.जी.कोलते यांची नियुक्ती झाली. ते बुधवारी आपल्या पदाचा भार स्वीकारणार असल्याचे जाहीरदेखील झाले होते. बुधवारीच जळगाव जि.प.च्या सीईओपदी गडचिरोली येथील साहाय्यक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाल्याचे आदेश शासनाने काढले आहे. तर एस.जी.कोलते यांची आता नागपूर येथे आयुक्त (मनरेगा) या पदावर नियुक्ती झाली आहे. कोलते हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याने त्यांना नियामानुसार गृह जिल्ह्यात नियुक्ती मिळण्यात अडथळा असल्यामुळे त्यांची दुसरीकडे नियुक्ती झाल्याचे मानले जात आहे.